
रुबिक्स क्यूबचे कोडे कधी चटकन सुटते किंवा कधी सुटत नाही. हा खेळ म्हणजे एक प्रकारे बुद्धीचा कस आहे. रुबिक्स क्यूब कोडे कमी वेळेत सोडवायचे असते. याबाबतीत जयदर्शन वेंकटेशन नावाच्या चिमुरडय़ाने तर कमाल केली आहे. त्याने चक्क सायकल चालवता चालवता रुबिक्स क्यूबचे कोडे सोडवले आहे. तेही फक्त 14.32 सेकंदात. हा जागतिक विक्रम आहे. याबद्दल जयदर्शनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
चेन्नईच्या जयदर्शन वेंकटेशनचा व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये जयदर्शन रुबिक्स क्यूब हातात घेऊन ते सोडवत आहे. एकीकडे तो सायकल चालवत आहे, तर दुसरीकडे हातात रुबिक्स क्यूब घेऊन सोडवत आहे. अवघ्या 14 सेकंदात त्याचं कोडं सोडवून होतं आणि तो आनंदही व्यक्त करतो.
जयदर्शनचे टॅलेंट स्पीडक्युबिंग या श्रेणीत येते. जयदर्शन दोन वर्षांपासून रुबिक्स क्यूबचा वेग वाढवण्यासाठी मेहनत घेत होता, असे गिनीज बुकने म्हटले आहे.
























































