जितेंद्र नवलानी विरोधातील तक्रारीची चौकशी सुरू; जबाब नोंदविण्यासाठी संबंधितांना समन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जितेंद्र नवलानी व अन्य लोकांविरोधात फसवणूक, खंडणी व गुन्हेगारी कट रचून कोटय़वधी रुपये उकळल्याप्रकरणी शिवसेनेचे अरविंद जगन्नाथ भोसले यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीची आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी काही संबंधितांना त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आला असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.

अरविंद भोसले यांनी जितेंद्र नवलानी व अन्य लोकांनी जी खोटी कामे करून कोटय़वधी रुपये उकळल्याविरोधात सविस्तर तक्रार मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासाकरिता देण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने भोसले यांच्या तक्रारीनुसार चौकशीला सुरुवात केली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली जाईल. त्यानंतर तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे आर्थिक व्यवहारासंबंधीची कागदपत्रे किंवा तक्रारदाराकडे काही अधिकची माहिती असल्यास ती घेतली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱयाने तेव्हा सांगितले होते. त्यानुसार आता तक्रारीत नाव आहे अशा काही कंपनीचे संचालक तसेच संबंधितांना त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी बोलावण्यात आले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. याबाबत अधिकाऱयांकडून दुजोरा मिळू शकला नाही.

जितेंद्र नवलानी हा कशाप्रकारे ईडी अधिकाऱयांचा दलाल म्हणून काम करत होता. कुठल्या कंपन्यांकडून नवलानीला पैसे पुरविले गेले होते. त्याचा पूर्ण कालाचिठ्ठाच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिला होता. परंतु त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.

शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी जितेंद्र नवलानी याच्या माध्यमातून झालेल्या  कोटय़वधीच्या वसुलीविरोधात पुराव्यासह मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार चौकशी सुरू करून आर्थिक गुन्हे शाखेकडून काही जणांचा जबाब नोंदवला जाणार आहे. जर जबाबातून नवलानीने धमकावून पैसे उकळल्याचे समोर आल्यास याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल होऊन पुढील कारवाई केली जाईल, असेही समजते.