
मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने दृष्टिहीनांसाठी एक खास सेन्सर चष्मा व काठी बनविली आहे. असजद मुस्ताक बागवान याने टाकाऊ वस्तूंचा वापर करून कमी खर्चात या वस्तू बनविल्या आहेत. गावातील एक अंध व्यक्ती विजेच्या खांबाला धडकल्याचे पाहून त्याने दृष्टिहीन व्यक्तींसाठी काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून चष्मा व काठी तयार केली. तसेच या वस्तू दृष्टिहीनांसाठी वरदान ठरणार असल्याचेही तो सांगतो.
असजद हा महात्मा गांधी विद्यालयामध्ये शिकत आहे. एक दृष्टिहीन व्यक्ती गावात काठीचा आधार घेत फिरत असताना तो एका विजेच्या खांबाला धडकला. हे असजद याने पाहिले. त्यामुळे अशा दृष्टिहीन व्यक्तींसाठी काहीतरी करावे, अशी भावना त्याने आपले वर्गशिक्षक रियाज मुजावर यांना बोलून दाखविली. त्यासाठी त्याने त्यांचे मार्गदर्शन घेऊन टाकाऊ वस्तूंपासून अत्यंत कमी खर्चात आधुनिक चष्मा तयार केला.
टाकाऊ पाइपची स्टिक, लहान वायर, छोटा सेन्सर आणि अंधांसाठी असलेला काळा चष्मा यांचा वापर करून सेन्सर चष्मा तयार केला. त्यामुळे अंध व्यक्ती कुठेही निघाल्यास समोर कोणी व्यक्ती, दगड, भिंत व विजेचा खांब असा कोणताही अडथळा असल्यास हे लगेच अंध व्यक्ती कळते. त्याची काठी कोणत्याही दिशेला वळविली तरी तेथे अडथळा असल्यास त्वरित आवाज येतो. यामुळे अंध व्यक्तीला मार्गातील अडथळा ओळखता येते आणि तो पार करून पुढे जाता येते. आता नळाद्वारे वाया जाणाऱया पाण्यावर उपाययोजना यावर संशोधन सुरू असल्याचे असजदने सांगितले.
हा चष्मा बनविण्यासाठी चष्मा 300 ते 400 रुपये, काठी 200 ते 300 रुपये, सेन्सर 500 ते 600 रुपये आणि वायर 50 ते 60 रुपये असा एकूण सुमारे एक ते दीड हजार रुपये खर्च येत आहे. भविष्यात दृष्टिहीनांसाठी यापेक्षा अधिक चांगला आणि कमी खर्चात चष्मा तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे.’
– असजद बागवान






























































