वरळीत आंतरराष्ट्रीय मत्स्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा, दुग्धशाळा आरे वसाहतीत स्थलांतरित होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळीतील दुग्धशाळेच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वरळी दुग्धशाळेची सुमारे 10 एकर जागा मत्स्यालयासाठी नगरविकास विभागाला हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून येथील दुग्धशाळा आरे वसाहतीतील दुग्धशाळेच्या जागेवर हलविण्याचे आदेश दूध व्यवसाय आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही काळातच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल व मत्स्यालयाच्या कामाला वेग येणार आहे.

वरळी डेअरी सुमारे 14.5 एकरमध्ये पसरलेली आहे. 0.7 एकर जागेवर दुग्ध आयुक्त कार्यालयाच्या ताब्यात आहे. तसेच 0.9 एकरमध्ये वर्ग 3 कर्मचारी निवासस्थान असून 2.8 एकरमध्ये वर्ग 4 कर्मचाऱयांचे निवासस्थान आहे याची सुमारे चार एकर जागा वगळून सुमारे 10 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारले जाणार आहे.

दरम्यान, सुरुवातीला येथील रिकामी 10 एकर जागा पर्यटन विभागाकडे देण्याचा प्रस्ताव होता. मात्र गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुख्य सचिवांनी एका बैठकीत ही जागा राज्याच्या नगरविकास विभागाला देण्याचा निर्णय घेतला. दुग्धव्यवसाय विभाग ही जमीन महसूल विभागाकडे सुपूर्द करेल. जी त्यांच्याकडून नगरविकास विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाल्यानंतर वरळी डेअरी विभागचे आरे कॉलनीत स्थलांतर करण्यात येईल.