देवगड शहरात दुकान फोडीचे सत्र सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड शहरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने देवगड बस स्थानकासमोरील ३ दुकानांचे कुलूप हत्याराने तोडून दुकानात प्रवेश केला. तसेच दोन सीसीटीव्ही फोडून नुकसान केले. यावेळी 12 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या घटनेबाबत मोहम्मद शोएब चेरुवलापिलली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, देवगड पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू रॉयल बेकरी हे दुकानाचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडूले तसेच दोन सीसीटीव्ही तोडून टाकून दुकानात प्रवेश केला. या दुकानातील 9200रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या दुकानाजवळ असलेल्या अलंकार कॉस्मेटिक या दुकानाचे कुलूप तोडून रुपये 3000 एवढी रक्कम तसेच स्वामी समर्थ जनरल स्टोर्स या दुकानाचेही कुलूप तोडून त्या दुकानातील 250 रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला.

अशा प्रकारे दुकान फोडीचे सत्र देवगड शहरात सुरू असल्यामुळे श्वान पथक आणि ठसे तज्ञ यांना बोलवण्यात आले, मात्र अद्याप अज्ञात चोरट्याचा सुगावा लागलेला नाही. ठराविक अंतराने श्वानाने धाव घेऊन अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्याला यश आले नाही. या पूर्वी देवगड शहरात तीन दुकाने अज्ञात चोरट्याने फोडली होती. त्यामुळे स्थानिक व्यापारी हैराण झाले असून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटने संदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादवि. कलम 380, 454, 457 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार राजन जाधव पोलीस नाईक अशिष कदम हे करीत आहेत.