उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळीत, उन्हाचा शेतीच्या कामांवर विपरीत परिणाम; नियोजन कोलमडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ढगाळ वातावरण संपल्यानंतर गेल्या तीन-चार दिवसांपासून सूर्य अक्षरशः आग ओकू लागला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उष्णतेचा कहर असाच सुरू राहिला, तर पुढचे दोन महिने शेतकरी बांधवांसाठी अग्निपरीक्षेचे ठरणार आहेत. उन्हाच्या प्रचंड कडाक्यामुळे शेतीकामाचे पूर्ण नियोजन कोलमडले आहे. दरम्यान, हवामान विभागाने सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट आणखी तीन ते चार दिवस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱयांची आणखी चिंता वाढली आहे.

यंदा भरपूर पाऊस झाल्याने पाण्याची आबादानी झाली. कधी नव्हे ते यंदा अनेक वर्षांनंतर फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत चांगलीच थंडी राहिली. मात्र, मार्च महिना सुरू होताच उन्हाचा कडाका वाढायला सुरुवात झाली. दरवर्षी होळीनंतर उन्हाचा तडाखा सुरू होतो. यंदा मात्र होळीच्या अगोदरच उन्हाचा कडाका सुरू झाला. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, तपमानाचा पारा 37 अंशाच्या पुढे गेला आहे. सकाळी सात वाजल्यापासून प्रखर उन्हाला सुरुवात होते. याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. सकाळी 11 वाजेपासून 4 वाजेपर्यंत रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. कडक उन्हाळ्यापासून बचाव होण्यासाठी नागरिकांनी थंडपेयाचा आसरा घेतला आहे. तीव्र उष्णतेमुळे घरात थांबणेदेखील मुश्कील झाले आहे.

एकीकडे नागरिकांची अशी स्थिती असताना शेतीच्या कामावरही उष्णतेचा परिणाम झाला आहे. उन्हाच्या कडाक्याने शेतातील पिके लवकर पाण्यावर येऊ लागली आहेत. त्यातच महावितरणने चार दिवस दिवसा व चार दिवस रात्रीचा वीजपुरवठा सुरू ठेवल्याने रात्री दहा, साडेदहानंतर पिकांना पाणी भरण्यासाठी शेतकरी बांधवांना शेतात जावे लागते व रात्रभर पिकाला पाणी द्यावे लागते. पाणी भरण्यामुळे झोप मिळत नाही तर दिवसा प्रचंड उकाडय़ामुळे झोप होत नाही, याचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.

सोलापूरचा पारा 42.1 अंशांवर

सोलापूर ः शहरात यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी 42.1 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची आज नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, उकाडा आणि उन्हाच्या चटक्याने सोलापूरकर हैराण झाले आहेत. गेल्या आठवडय़ात तापमान घटले होते. सोमवारपासून तापमान वाढत असून, मंगळवारी एक टक्क्याने वाढ होत 42.1 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. सोलापूरच्या इतिहासात 43.9 अंश सेल्सिअस इतक्या सर्वोच्च तापमानाची यापूर्वीच नोंद आहे. यंदाच्या वर्षी उन्हाळा मार्चमध्येच तीक्र झाला असून, हवामान खात्याने 31 मार्चपर्यंत 43 अंशांच्या पुढे तापमानाची नोंद होईल, असा अंदाज वर्तविला आहे. या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका आबालवृद्धांना बसत आहे.

जिवावर उदार होऊन बळीराजाची धडपड

सध्या अनेक ठिकाणी कांद्याची काढणी सुरू झाली आहे. तसेच गहू, हरभरा पिकांचे खळे सुरू आहे. सध्या शेतात काढणीचा हंगाम सुरू आहे; परंतु प्रचंड उष्णतेचा त्यावरदेखील मोठा परिणाम झाला आहे. प्रचंड उष्णतेमुळे काम करण्यास मजूर धजावत नसल्याने नाईलाजाने पिकांचे खळे रात्री काढावे लागत आहे. काढणी व सोंगणी झालेल्या कांदा, गहू, हरभरा या पिकांच्या जमिनीला प्रचंड उष्णतेमुळे मोठमोठय़ा भेगा पडल्या आहेत. या भेगातून रात्री साप, नाग यासारखे प्राणी बाहेर पडत असून, त्यामुळे जीविताला धोका निर्माण झाला आहे. या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठी बळीराजा जिवावर उदार होऊन धडपड करत आहे.

जनावारांच्या चाऱयाचा प्रश्न

सध्या मुळा डाव्या कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सुरू आहे. त्यामुळे काहीअंशी पाण्याचा प्रश्न जाणवत नसला, तरी आवर्तन संपल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या याप्रमाणे पाण्याचा प्रश्न सतावणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे चारापिके करपू लागली आहेत. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुधाळ जनावरांच्या दुधावरही परिणाम झाला आहे. जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी झाली आहे. एकंदरीत उष्णतेच्या लाटेचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे.