
सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिह्यांतील अनुक्रमे कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, कराड, सांगोला तालुक्यांना वरदान ठरणाऱया टेंभू उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन आजपासून सुरू करण्यात आले होते. पालकमंत्री जयंत पाटील यांनी आवर्तन सुरू करण्याचे निर्देश दिले होते, अशी माहिती सांगलीचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांनी दिली.
उन्हाळ्याची तीव्रता आणि लाभधारकांची मागणी लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आले आहे. टेंभू बॅरेजचे मुख्य दरवाजे बंद करून अपेक्षित पाणीसाठा करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने व प्राधान्याने जोड कालवा 1 व 2 अंतर्गत कडेगाव तालुक्यातील लाभक्षेत्र तसेच टप्पा 3, 4 व 5 अंतर्गत खानापूर, तासगाव, आटपाडी आणि सांगोला या तालुक्यांत तसेच पुणदी विसापूर उपसा सिंचन योजना कार्यान्वित केली आहे. साधारणपणे एप्रिल ते जून 2022 अखेर 6 टीएमसी पाणी उचलण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे.


























































