
>>प्रसाद ताम्हनकर
गेल्या काही काळापासून सोशल मीडिया अर्थात फेसबुक, ट्विटर यांसारख्या कंपन्यांवर जगभरात अनेक आरोप होत आहेत. यामध्ये चुकीच्या आणि खोटय़ा बातम्यांचा प्रसार करणे, समाजात दुही पेरणे, विशिष्ट विचारसरणीचा प्रचार करणे आणि मुख्य म्हणजे प्रमुख राजकीय पक्षांशी हातमिळवणी करून निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करणे, समाजाचे ध्रुवीकरण करणे असे प्रमुख आरोप होत असतात. निवडणुकांमधील सोशल मीडियाचा हस्तक्षेप हा मुद्दा नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड गाजला होता.
हिंदुस्थानात सोशल मीडियाच्या प्रादुर्भावाविषयी बऱयाचदा चर्चा होत असते. यासंदर्भात सरकारने केलेल्या काही कायद्यांनंतर ही चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र आता नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘अल जझिरा’च्या यासंदर्भातील अहवालानंतर दबक्या आवाजात सुरू झालेल्या या चर्चेला श्रीमती सोनिया गांधी यांनी लोकसभेत याच अहवालाचा संदर्भ देत सोशल मीडियावर केलेल्या आरोपांनंतर चांगलीच वाचा फुटली आहे. सोशल मीडिया अर्थात फेसबुकसारख्या कंपन्या सत्तेत असलेल्या पक्षाशी हातमिळवणी करत त्या पक्षाचा अजेंडा रेटण्यासाठी, समाजात दुही पसरवण्यासाठी कशी मदत करतात याचा ‘लेखाजोखा’च त्यांनी सादर केला.
सोनिया गांधी यांनी संदर्भ दिलेल्या या ‘अल जझिरा’च्या अहवालामध्ये नक्की आहे तरी काय? ’अल जझिरा’चा अहवाल म्हणजे ‘अल जझिरा’, ‘द रिपोर्टस् कलेक्टिव्ह’ आणि ’ad.watcha’ यांनी फेब्रुवारी 2019 ते नोव्हेंबर 2020 या 22 महिन्यांमध्ये फेसबुकवर प्रसिद्ध झालेल्या 5 लाखांपेक्षा जास्त राजकीय जाहिरातींचा अभ्यास करून संयुक्तपणे अभ्यासलेला आणि त्यातून काढलेला निष्कर्ष आहे. या अहवालातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या हिंदुस्थानात सत्ताधारी पक्ष, मोठय़ा कंपन्या आणि फेसबुकसारख्या मोठय़ा सोशल मीडिया कंपन्या यांच्यामधील वाढत चाललेला संवाद आणि स्नेह हा आहे. हा ‘परस्पर संवाद’ समाजाचे ध्रुवीकरण करण्यासाठी कसा हातभार लावतो आहे याचेदेखील या अहवालात वर्णन करण्यात आले आहे.
हा अहवाल तीन भागांत प्रकाशित करण्यात आलेला आहे. याच्या पहिल्या भागात हिंदुस्थानात सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांकडून आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या संघटनांकडून त्याच्या राजकीय जाहिरातींसाठी फेसबुकने जे दर आकारले; त्याच्या 29 पट अधिक दर हे विरोधी पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांकडून आकारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाला हितकारक ठरतील अशा ‘भ्रामक’ बातम्या पसरविण्यासाठी बेनामी आणि खोटय़ा नावाने उघडल्या गेलेल्या कंपन्यांनादेखील फेसबुकने कशी परवानगी दिली याचे विश्लेषण करण्यात आले आहे. पुढील भागामध्ये या पाच लाख जाहिरातींसाठी जाहिरातदारांचा ‘डेटा’देखील कसा ‘ऍक्सेस’ करण्यात आला याचे विश्लेषण देण्यात आले आहे. या अहवालाचा पुढचा भागदेखील लवकरच समोर येणार असून त्यामध्ये फेसबुकच्या ‘अल्गोरिदम’विषयी आणि लोक विशिष्ट बातम्यांना कसे चिकटून राहतील यासाठी फेसबुकने कसे प्रयत्न केले याची ‘पोलखोल’ उघडली जाणार असल्याची चर्चा आहे.
फेसबुकने मात्र हा अहवाल ठामपणे फेटाळून लावलेला आहे. मेटा (जुने नाव फेसबुक) कंपनी जागतिक स्तरावर कार्यरत असून जगभरात ती ‘सर्वांना समान न्याय व समान संधी’ या तत्त्वावर कार्यरत आहे आणि असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थात, अहवालामध्ये जाहिरातीच्या दरात केलेल्या ‘असमानतेच्या’ उल्लेखाबद्दल मात्र फेसबुकने भाष्य करणे टाळले आहे.
[email protected]





























































