
>> स्पायडरमॅन
रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला सुरुवात झाली आणि सोशल मीडियावरदेखील या युद्धाची प्रचंड चर्चा सुरू झाली. या युद्धाच्या ताज्या बातम्या, हे युद्ध सुरू होण्याची कारणे, या युद्धाचे भविष्यकालीन परिणाम, रशियाची युद्धसामग्री, युक्रेनची युद्धसामग्री, जगातील कोण देश कोणाच्या बाजूने, हिंदुस्थानची या युद्धातील भूमिका आणि तिचे देशावर होणारे परिणाम अशा अनेक युद्धाशी निगडित विषयांवर मोठय़ा प्रमाणात चर्चा गेला बरेच काळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर रंगल्या आहेत. या युद्धाच्या निमित्ताने भूतकाळातील अनेक आठवणीदेखील लोक नव्याने जागवत आहेत आणि त्यामुळे अनेक माहीत नसलेल्या रंजक गोष्टी समोर येत आहेत.
या युद्धाच्या निमित्ताने सध्या ’मतीरे की राड’ ही हिंदुस्थानात घडलेली लढाई चर्चेत आलेली आहे. एका साध्या कलिंगडावरून घडलेले युद्ध हजारो लोकांचे प्राण घेऊन शांत झाले असे मानले जाते. नक्की होती काय ही घटना? सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कथेनुसार आजपासून साधारण 376 वर्षांपूर्वी 1644 सालच्या सुमारास हे युद्ध घडले. त्या काळात बिकानेर राज्यातल्या ‘सीलवा’ गाव आणि नागोर राज्यातील ‘जाखनीया’ गाव या दोघांची सीमा एकमेकांना लागून होती. दोन्ही राज्यांचे शेवटचे टोक असलेल्या या दोन्ही गावांमध्ये शत्रुत्व जोरात होते. अशातच बिकानेरच्या सीमेत असलेल्या एका कलिंगडाच्या वेलाला छानसे कलिंगड लागले, मात्र ते आले नागोरच्या सीमाभागात. दोन्ही राज्यांच्या बरोबर सीमेवर असलेल्या या वेलाच्या कलिंगडावरून मग जोरदार वाद सुरू झाला. ‘कलिंगड कोणाचे?’ या प्रश्नावरून चक्क युद्धाला तोंड फुटले. गंमत म्हणजे या काळात या दोन्ही परगण्यांचे राजे आपापल्या राज्यात नव्हते. रामचंद्र मुखिया यांनी बिकानेरचे नेतृत्व केले, तर सिंघवी सुखमल यांनी नागोरचे. मोगल साम्राज्याच्या सेवेत असलेल्या या दोन्ही प्रांतांच्या राजांनी या युद्धाबद्दल माहिती झाल्यानंतर मोगल साम्राज्याला यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली, मात्र तोवर हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.
या कथेच्या सत्य-असत्येबद्दल अनेक मते व्यक्त होत असली तरी ही रंजक कहाणी मोठय़ा प्रमाणावर लोकांमध्ये चर्चेत आली आहे हे मात्र खरे.































































