
सोलापुरातील फताटेवाडी येथे असलेल्या ‘एनटीपीसी’ प्रकल्पाने वीज उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला असून, येत्या 2032पर्यंत 1515 मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचबरोबर 23 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प सुरू केल्याची माहिती कंपनीचे मुख्य सहव्यवस्थापक एन. एम. राव यांनी दिली आहे.
एनटीपीसी कंपनीचे विस्तारीकरण व बीजउत्पादनाच्या प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना महाव्यवस्थापक एन. एस. राव म्हणाले, ‘या प्रकल्पातून 2032पर्यंत 1515 मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आरई स्रोताद्वारे 60 जीडब्ल्यू क्षमता निर्माण करण्याची योजना तयार करण्यात आली असून, यामुळे वीजनिर्मितीच्या क्षमतेत 45 टक्के वाढ होणार आहे. कंपनीने मागील वर्षीपेक्षा 40 टक्के जास्त उत्पादनक्षमता सर्वोत्तम कामगिरी करीत जनरेशन व इतर पॅरामीटर्समध्ये सर्वांत पुढे आहे,’ असे सांगितले.
सौरऊर्जेबाबत माहिती देताना राव म्हणाले, ‘एनटीपीसीने पोर्ट फोलिओमध्ये हरित ऊर्जा मिळविण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 23 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला असून, त्याचे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत कंपनीने सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून तीन लाख झाडे लावली असून, आणखीन एक लाख 42 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. एनटीपीसी कंपनीने सोलापूर टाऊनशिपमध्ये 812 किलोवॅट रूफटॉप सोलर व पवनऊर्जेची निर्मिती केली आहे. त्यामुळे हरित ऊर्जा निर्माण होण्यास मदत होत आहे.
यावेळी अनुरूप विभागाचे महाव्यवस्थापक राजीव अकिटकर, मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक के. एन. मूर्ती, महेश हाटकर, अजित कुमारसिंह उपस्थित होते.
थेट पाइपलाइनसाठी देणार 250 कोटी
सोलापूरकरांसाठी उजनी धरणातून थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी 250 कोटी रुपयांचा निधी देणार असून, यांतील 55 कोटी रुपये पालिकेला देण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या परिसरातील वृक्षारोपणामुळे पर्जन्यमानात वाढ झाली असून, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढत असल्याचे एन. एस. राव यांनी सांगितले.































































