
>> प्रज्ञा सदावर्ते
मातीशी घट्ट नाते जपणारे प्रतिभावान कवी प्रकाश होळकर यांनी कोरडवाहू जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदना, त्यांची स्वप्नं आपल्या कवितेतून उलगडली आहेत. त्यांच्या आशयसमृद्ध कवितांना लोकगीताप्रमाणे स्वतःची लय आहे. म्हणूनच त्या गाणं होऊन रसिकांच्या मनात घर करून राहिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मनाचं आभाळ मांडणाऱ्या या कवीचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सदस्यपदी बिनविरोध निवडून गौरव केला आहे. होळकर यांच्या रूपाने हा बहुमान नाशिक जिल्ह्याला प्रथमच मिळाला आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव हे होळकर यांचं गाव. आजोळी मोटेवरचं गाणं, आजीच्या जात्यावरच्या ओव्यांमुळे लोकगीत बालपणीच त्यांच्या मनात रुजले. जेव्हा दुष्काळानं मातीसोबतच भवताल होरपळत होतं, तेव्हा अस्वस्थ झालेलं काळीज कविता होऊन वास्तव मांडू लागले.
‘वाकल्या झाडाचा पाचोळा भुईला,
फाटल्या भुईचा आधार रुईला’
ही त्यांची पहिली कविता, तिला 1985 साली अनुष्टुभ अंकात स्थान मिळालं. अशाप्रकारे शिक्षण सुरू असताना इथल्या मातीतूनच काव्यप्रतिभा अंकुरली आणि बहरली. एम.ए. (मराठी) पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मान्यवरांच्या आग्रहामुळे त्यांनी पाच वर्षे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले, पण नाळ मातीशी जोडलेली होती. आजही ते पूर्णवेळ शेतीच करतात. संवेदनशील मनासोबत त्यांनी साधेपणाही जपला आहे. त्यामुळे त्यांची कविता खरी आहे. 1997 मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘कोरडे नक्षत्र’ प्रकाशित झाला. ‘मृगाच्या कविता’ हा आगामी काव्यसंग्रह आहे. ‘रानगंधाचे गारूड’ या ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निवडक पत्रसंग्रहाचे त्यांनी संपादन केले आहे. महाराष्ट्रातील सारस्वतांनी महानोर यांच्याशी केलेला पन्नास वर्षांतील हा पत्रसंवाद महाराष्ट्रातील वाङ्मयीन, सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाची ओळख करून देणारा आहे.
होळकर यांच्या गीत लेखनाचा प्रवास ‘सर्जा राजा’ चित्रपटापासून सुरू झाला. सर्जा राजा, टिंग्या, बाबू बॅण्डबाजा, टपालमधील गाण्यांना राज्य शासनाचा ग. दि. माडगुळकर पुरस्कार मिळाला आहे. तीन वेळा त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने चित्रपट महर्षी बाबूराव पेंटर स्मृती सन्मानचिन्हाने गौरविले आहे. गोष्ट छोटी डोंगराएवढी, चिनू, जागर अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन करीत वेगळेपण सिद्ध केले आहे. अमेरिकेत झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात, गोवा येथे आयोजित साहित्य अकादमीच्या बहुभाषिक काव्य संमेलनात विशेष निमंत्रित म्हणून त्यांनी काव्यवाचन केले. ‘कविता विसाव्या शतकाची’ या डॉ. वसंत आबाजी डहाके, शांताबाई शेळके यांच्यासह साहित्यिकांनी संपादित केलेल्या सर्वोत्कृष्ट कवितांच्या ग्रंथात त्यांच्या ‘ज्योतिबा’ कवितेचा समावेश आहे. गोवा विद्यापीठ, कर्नाटकचे गुलबर्गा विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील चार विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांना स्थान मिळाले आहे. राज्य शासनाच्या मराठी भाषा सल्लागार मंडळावर ते सदस्य असून, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्तही आहेत. काव्यलेखनासाठी अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
‘भरू दे यंदा मृगाचं आभाळ,
नावाचा तुझ्या यळकोट करील’
ही काळजातून आलेली हाक आहे. त्यांच्या सर्वच कविता जगाला वास्तवाचे भान देतात.

























































