लेख – स्वच्छ ऊर्जेचा मार्ग पुन्हा खडतर?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुनीता नारायण

जीवाश्म इंधनाचे ज्वलन करण्याच्या दुष्परिणामांपासून आपण अजूनही धडा घेतलेला नाही असेच दिसते. आज जगाला वेळेच्या आणि कार्बन स्पेसच्या कमतरतेचा सामना करावा लागत असताना ही परिस्थिती खरोखर चिंताजनक आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वीच इंधनाचे दर चढे होते. प्रश्न असा की, या किमतींमध्ये होणारी प्रचंड वाढ आपल्याला अधिक हरित आणि स्वच्छ भविष्याकडे घेऊन जाणारी ठरेल का?

जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून आपण आतापर्यंत काही धडा घेतला आहे का? हवामानातील बदल हा ऊर्जेच्या वाढत्या मागणीचा परिणाम आहे, हे आपल्याला माहीत आहे का? जीवाश्म इंधन, कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या ज्वलनामुळे जग आज हवामान संकटाच्या उंबरठय़ावर आहे. तापमानवाढीचे पृथ्वीवरील परिणाम भयानक असतील, याचा ‘इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’च्या 2022 च्या अहवालात पुनरुच्चार करण्यात आला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, केवळ आपले जगच नव्हे तर ऊर्जेची बाजारपेठही उकळत आहे.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वीच इंधनाचे दर चढे होते. प्रश्न असा की, या किमतींमध्ये होणारी प्रचंड वाढ आपल्याला अधिक हरित आणि स्वच्छ भविष्याकडे घेऊन जाणारी ठरेल का? की सरकारे जुन्याच पद्धतींचे अनुसरण करत राहतील आणि एवढे सगळे होऊनही त्यांच्या भरवशाच्या जीवाश्म इंधन प्रणालीत पुन्हा एकदा गुंतवणूक करतील? दुसऱ्या शब्दांत, किमतीतील ही अस्थिरता ऊर्जा व्यवसायाला पुनर्जीवित करेल का? विशेषतः युरोप आणि जर्मनीला हे कोडे प्रामुख्याने भेडसावत आहे. युरोपने नूतनीकरणक्षम ऊर्जेत गुंतवणूक केली आहे; परंतु ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा देश कोळसा आणि जीवाश्म इंधनापेक्षा स्वच्छ असलेल्या नैसर्गिक वायूच्या आयातीवरदेखील अवलंबून आहे. या देशाला सुमारे 40 टक्के नैसर्गिक वायू रशियाकडून मिळतो. आता युद्धामुळे पुरवठा खंडित झाला आहे.

आशियातून बाल्टिक समुद्रामार्गे येणाऱ्या पूर्वनिर्मित नॉर्ड स्ट्रीम 2 पाइपलाइनची प्रमाणीकरण प्रक्रिया जर्मनीने थांबविली आहे. रशियासोबतच्या सध्याच्या गॅस करारावरून दोन्ही देशांमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. जर्मनीचे चान्सलर ओलाफ शुल्त्झ यांनी 7 मार्च रोजी एक निवेदन जारी केले होते. त्यात म्हटले होते की त्यांचा देश आणि युरोप उष्णता, परिवहन आणि विजेसारख्या ऊर्जेची गरज भागविण्यासाठी पूर्णपणे रशियावर अवलंबून आहे आणि त्यामुळे अल्पावधीत करार मोडू शकत नाहीत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, अधिक प्रभावी पाऊल उचलण्यासाठी युरोपवर युक्रेन आणि अमेरिकेकडून दबाव आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले की, त्यांचा देश रशियाकडून तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याच्या शक्यतेबद्दल युरोपातील मित्रराष्ट्रांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे केवळ बाजारातील परिस्थिती आणखीच बिघडली. शिवाय तेलाच्या किमती 139 डॉलर (सुमारे 10,000 रुपयांपेक्षा जास्त) प्रतिबॅरल (सुमारे 159 लिटर) इतक्या वाढल्या. परंतु युद्ध सुरू असताना भविष्यात काय परिस्थिती उद्भवू शकते याचे संकेतही या किमतींनी दिले. म्हणूनच धोरणाच्या केंद्रस्थानी ऊर्जासुरक्षा ठेवण्याची गरज आहे. जरी हवामान बदलापेक्षा जास्त महत्त्व त्याला दिले गेले नाही, तरी किमान समसमान महत्त्व देणे आवश्यक असेल. जर्मनीने गॅस पुरवठय़ात वैविध्य आणण्यासाठी द्रवीभूत नैसर्गिक वायू (एलएनजी)  टर्मिनल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेतील नैसर्गिक वायू कंपन्यांसाठी युरोप ही नवी बाजारपेठ निर्माण झाली आहे.

दुसरीकडे, युरोप ऊर्जा पवन आणि सौर अशा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहे. या स्वच्छ ऊर्जास्रोतांना स्वातंत्र्याची ऊर्जा मानून अतिरिक्त महत्त्व दिले जात आहे. प्रश्न असा आहे की, तेल बाजारातील सध्याची अस्थिरता अर्थव्यवस्थांना रुळावरून उतरवेल की ऊर्जेच्या वैविध्याला चालना देईल? ब्रिटनच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. या देशाने कपातीची आक्रमक उद्दिष्टे घेऊन जलवायू क्षेत्रातील आघाडीचा देश म्हणून स्वतःला प्रस्थापित केले आहे. परंतु गंमत अशी की, ब्रिटनच्या हवामान बदलावरील समितीने उत्तरेकडील समुद्रात तेल आणि वायूचे निस्सारण करण्यात येणारे अडथळे दूर केले आहेत.

ब्रिटन त्याच्या ऊर्जाविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी रशियावर अवलंबून नाही; परंतु एप्रिलमध्ये देशांतर्गत ऊर्जेच्या किमती दुप्पट होतील. त्यांच्या ऊर्जा नियामकाने किमतीवरील मर्यादा काढून टाकली आहे. त्याचा परिणाम तेल आणि वायूच्या वाढत्या देशांतर्गत खर्चाच्या रूपाने दिसून येईल. म्हणूनच ब्रिटनला अशी चिंता आहे की, जनतेला ऊर्जेच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे लोक संतप्त होऊ शकतात. म्हणूनच, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विकसनशील जगाने कोळशापासून दूर राहावे, असा उपदेश करणारे सरकार आता देशांतर्गत जीवाश्म इंधन उद्योगात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत आहे. हवामान बदलाचा सामना करण्याच्या प्रयत्नांमुळे ऊर्जेचे युद्ध संपुष्टात येईल का?

तेल आणि वायूच्या किमती वाढण्याचे कारण म्हणजे कोविड-19 मुळे जगभरात गेल्या दोन वर्षांत झालेली आर्थिक घसरण. परिणामी, ऊर्जेची मागणी घटली. गुंतवणूक घटली आणि नवीन संधी निर्माण झाल्या नाहीत. परंतु लॉकडाऊन उठविल्यानंतर आणि विविध देशांमध्ये व्यवसाय-उद्योग पुन्हा एकदा सामान्य झाल्यानंतर ऊर्जेची मागणी पुन्हा वाढली आणि त्यामुळेच भावही वाढले.

युद्धामुळे ही परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. त्याच वेळी एक सोयीस्कर धारणा अशीही बनली आहे की, हवामान बदलाचा झटपट सामना करण्यासाठी ऊर्जा संक्रमणावर जास्त जोर देणे अनियोजित आणि अव्यवहार्य होते. त्यामुळे प्रचंड उलथापालथ झाली आहे आणि ती चालणार नाही. त्याऐवजी, बदलांसाठी व्यावहारिक आणि संतुलित योजना हवी आहे. मग हा पारंपरिक ऊर्जा व्यवसायामधील स्थित्यंतरामागील युक्तिवाद ठरतो. तरीही यात थोडाबहुत फरक आहे. हा युक्तिवाद जीवाश्म इंधनापासून होणारे उत्सर्जन थांबविण्याविषयीचा आहे. त्याचबरोबर मिथेन कमी करणे आणि कार्बनचे अवशोषण तंत्रज्ञानात गुंतवणुकीची गरज अधोरेखित करतो.

अशा प्रकारे, सध्याच्या ऊर्जा संकटामुळे जग पुन्हा एकदा जीवाश्म इंधनाकडे वळू शकते. अनेक वर्षांपासून पृथ्वीवरील जीवन कठीण बनविण्यासाठी आणि वातावरणातील उत्सर्जन वाढविण्यासाठी कारणीभूत मानलेले हे इंधन आहे. जीवाश्म इंधनाचे ज्वलन करण्याच्या दुष्परिणामांपासून आपण अजूनही धडा घेतलेला नाही, असेच दिसते. आज जगाला वेळेच्या आणि कार्बन स्पेसच्या कमतरतेचा सामना करावा लागत असताना ही परिस्थिती खरोखर चिंताजनक आहे.

(लेखिका सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एन्व्हायर्नमेंट (सीएसई)च्या संचालिका व ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ आहेत.)