बेकायदा बांधकाम आठवड्यात तोडा, नाहीतर आम्ही तोडू! मोहित कंबोज यांना पालिकेचा अल्टीमेटम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांताक्रुझ येथील घरातील बेकायदा बांधकाम सात दिवसात तोडा, अन्यथा पालिका हे बांधकाम स्वत: तोडेल असा कारवाईचा अल्टीमेटम पालिका प्रशासनाने भाजपचे नेते मोहित कंबोज यांना दिला आहे. याबाबत पालिकेने कंबोज यांना आज नोटीस बजावली आहे.

सांताक्रुझ पश्चिम येथील एसव्हीपी रोडवर खुशी प्राइड बेलमोंडो या तेरा मजली बिल्डिंगमध्ये मोहित कंबोज यांचे चार फ्लॅट आहेत. या फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम झाल्याची तक्रारी पालिकेच्या एच/पश्चिम कार्यालयात करण्यात आली होती. यानुसार पालिकेने मोहित कंबोज यांना नोटीस बजावून 23 मार्च रोजी त्यांच्या घराची तपासणी केली असता घरात बेकायदा बांधकाम आढळले होते. हे बांधकाम तोडण्यासाठी पालिकेने कंबोज यांना नोटीस बजावली आहे. ही सर्व बांधकामे कंबोज यांनी स्वत: तोडावीत अन्यथ पालिका ती बांधकामे तोडून त्याचा दंड आकारले असे नोटीसमध्ये म्हटले आहे. दरम्यान, पालिकेने आपल्या घराला नोटीसींना उत्तर देऊ आणि कायदेशीर मार्गाने लढाई लढू असे ट्विट कंबोज यांनी केले आहे.

असे आहे अनधिकृत बांधकाम

– 23 मार्चला पालिका अधिकार्‍यांनी कंबोज यांच्या इमारतीची पाहणी केली असता बेसमेंटमध्ये पार्किंग ऐवजी कार्यालय बांधण्यात आले आहे. जनरेटर रूम ला लागून सुरक्षा रक्षक व ड्रायव्हर यान्हयासाठी जागा बनवण्यात आली आहे.

– बेकायदेशीरीत्या लायब्ररी बनवण्यात आली आहे. पार्किंगला काचा लावून लोकांना बसण्याची जागा बनवण्यात आली आहे. इमारतीच्या पहिल्या आणि नवव्या मजल्यावरही बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याचे पालिकेने नोटीसीत म्हटले आहे.