वरळी येथील जन शिक्षण संस्थेच्या कार्यालयात पहाटेच्या वेळी एका चोरट्याने शिताफीने हात साफ केला. लोखंडी गज कापून त्या चोरट्याने कार्यालयातील शासनाचे संगणक, तीन डेस्कस्टॉप, लाऊडस्पिकर, अॅल्युमिनियमची शिडी चोरून नेली. दादर पोलिसांनी याबाबत माहिती मिळताच अवघ्या दोन तासात त्या चोराला शोधून काढले.
वरळीच्या आदर्शनगर येथे केंद्र सरकारच्या मानव कौशल्य विकास अंतर्गत येणाऱ्या जन शिक्षण संस्थेचे कार्यालय आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास या कार्यालयातील विविध साहित्य चोरीला गेल्याचे समोर आल्यानंतर दादर पोलिसांना कळविण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक महेश मुगुटराव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सागर शिवलकर, उपनिरीक्षक नौशाद तांबोळी, अरूण जाधव आदींच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला. अखेर पथकाने खबऱ्यांमार्फत त्यांना एक सुगावा लागला. त्यानंतर पोलिसांनी मुकेश खारवा उर्फ लंगडा याला ताब्यात घेतेल. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मुकेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात दादर तसेच अन्य पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

























































