3 मेनंतर भोंगे दिसतील तिथे हनुमान चालिसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मशिदीवरील भोंगे हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे. सणावारी समजू शकतो, पण 365 दिवस लाऊडस्पीकर का ऐकवता असे सांगतानाच 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा देशभरातील ज्या मशिदींवर भोंगे दिसतील तिथे हनुमान चालिसा वाजवण्यात येईल, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील सभेत सांगितले.

ते म्हणाले, आम्हाला कोणतीही तेढ निर्माण करायची नाही, महाराष्ट्राचे स्वास्थ्यही बिघडवायचे नाही. दंगलही घडवायची नाही. सरकारने राज्यातील सर्व मौलवींना बोलवून त्यांची बैठक घ्यावी. त्यांना 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे काढायला सांगवेत आणि महाराष्ट्र आनंदी ठेवावा, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात कुणी धंदाच करायचा नाही काय?

मला ईडीची नोटीस आल्यामुळे मी ट्रॅक बदलला, अशी टीका होते. पण मी ट्रॅक बदलला नाही. ‘कोहिनूर’ प्रकरणातून मी वर्षभरातच बाहेर पडलो. त्यानंतर ईडीची नोटीस आली. पुन्हा नोटीस आली तर मी पुन्हा सामोरे जाईन, अशा नोटिशींना मी भीक घालत नाही. असे सांगतानाच महाराष्ट्रात कुणी धंदाच करायचा नाही काय, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.