
सेव्ह विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले किरीट सोमय्या सध्या बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणी त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून नॉट रिचेबल झालेत. सातत्याने मीडियावर झळकणारे सोमय्या आहेत तरी कुठे असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. ठाण्यामध्ये देशद्रोही किरीट सोमय्या हरवले आहेत अशा आशयाचे भलेमोठे होर्डींग झळकले आहेत. सोमय्यांबद्दल माहिती देणाऱ्याला विशेष बक्षिस आणि सत्कार केला जाईल असे या होर्डींगवर लिहिले आहे. हे होर्डींग सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या हे दोघे गुन्हा दाखल झाल्यापासून गायब आहेत. या दोघांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं तीन पथकं तयार केली आहेत. सोमय्या यांना आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. चौकशीसाठी हजर न राहिल्यास त्यांच्या शोधासाठी तीन पथकं रवाना होतील.
आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी मंगळवारी दुपारी किरीट सोमय्या यांच्या मुलुंड येथील कार्यालयात पोहचले होते. पण ते तेथे आढळले नाहीत. त्यामुळे तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांकडे अधिकाऱ्यांनी नोटीस दिली. या नोटीसमध्ये 13 एप्रिलला पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर रहावे असे नमूद केले आहे. विशेष म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी सोमय्या पितापुत्रांच्या घरीदेखील गेले. तिथे सोमय्या पिता-पुत्र नसल्याने अधिकाऱ्यांनी घराच्या दरवाजावर नोटीस लावली आहे.
सोमय्या कुठे आहेत? केंद्राला विचारणार
‘विक्रांत बचाव’ निधीसंकलनात झालेल्या अपहारप्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या पिता-पुत्राचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. अटकेच्या भीतीने सोमय्या पिता-पुत्र गायब असून यावर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारने झेड दर्जाची सुरक्षा पुरविली आहे. त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा आम्ही केंद्रालाच विचारणार. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सोमय्यांबाबत प्रतिक्रिया देताना दुसऱ्यांवर आरोप करायचे आणि स्वतःवर आरोप झाले की चौकशीला सामोरे जायचे नाही. हे काही शूरपणाचे लक्षण नाही, असा टोलाही लगावला.





























































