
सोलापूर शहर व जिह्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. आज सकाळपासून भीमा नदीपात्रात सात हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
सोलापुरात उष्णतेचा पारा 42 अंशांहून अधिक आहे. उन्हाळ्याच्या झळा प्रचंड वाढल्या असून, पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गेल्या 15 दिवसांपासून उद्भवला होता. उजनी धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरलेले होते. त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटण्यात मदत झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिह्यासाठी 8.5 टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. येत्या आठ दिवसांपर्यंत हा विसर्ग सुरू राहणार असून, धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत.
उजनी धरणात सध्या 23 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून, स्लिप-वे, पॉवर हाऊस, सीना-माढा बोगदा, दहीगाव व मुख्य कालव्यातून असा सात हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, धरणातून आवर्तन सुटल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलाही पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱयांतही आनंदाचे वातावरण आहे.
कुरनूर धरणातूनही विसर्ग सुरू
अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून आजपासून विसर्ग सुरू झाला असून, यामुळे अक्कलकोट, मैंदर्गी व दुधनी नगरपरिषदांचा पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे. या विसर्गामुळे 51 गावांना पिण्याचे व शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. 1200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. सध्या धरणात 50 टक्के पाणीसाठा असून, सलग दोन दिवस धरणातून विसर्ग राहणार आहे. येत्या 28 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी असून, यावेळी अक्कलकोट येथे हजारो भाविक येतात. या पार्श्वभूमीवर शहराचा पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे.






























































