विनयभंगाच्या गुन्ह्यातही खंडपीठाने बाळ बोठेचा जामीनअर्ज फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी बाळ ऊर्फ बाळासाहेब बोठे याचा नियमित जामीन अर्ज संभाजीनगर खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी बुधवारी नामंजूर केला.

पत्रकार बाळ बोठे याच्यावर नगर येथील रेखा जरे हत्याकांड, खंडणीसह तीन गुन्हे दाखल आहेत. हैदराबाद येथून बोठे याला अटक केल्यानंतर पोलिसांनी तपास करत या गुन्ह्यामध्ये उर्वरित दहाजणांना अटक केली होती. यामध्ये काहीजणांना जामीन मिळालेला आहे. दरम्यान, बोठे याचा आयफोन पोलिसांनी जप्त करून तो फॉरेन्सिस लॅबकडे पाठविला आहे. रेखा जरे खून प्रकरणात बोठेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने संभाजीनगर खंडपीठाकडे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

एका विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात 27 डिसेंबर 2020 रोजी आरोपी बाळ बोठे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोठे याच्या वतीने नियमित जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. सरकारी वकील सतीश पाटील आणि फिर्यादीचे वकील सचिन पटेकर यांनी जामीन देण्यास विरोध दर्शविला. बोठे याच्यावर यापूर्वी दाखल असलेले विविध गुन्हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, असे म्हणणे सादर करण्यात आले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून जामीन अर्ज नामंजूर केला.