LPG पंगतीतले जेवण महागणार, गॅस सिलिंडर 102 रुपयांनी महागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागाईने रौद्ररूप धारण केले आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आता व्यावसायिकांचेही जगणे महाग करून टाकले आहे. घरातला सिलिंडर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर कधीच गेला होता, आता व्यावसायिक सिलिंडर दोन हजार तीनशे रुपयांच्याही वर पोहोचला आहे. त्यामुळे हॉटेलातले आणि लग्नाच्या पंगतीतले जेवण महागणार आहे.

तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसचे दर वाढवले आहेत. 19 किलोचा निळय़ा रंगाचा व्यावसायिक सिलिंडर किलोमागे 102.50 रुपयांनी महागला आहे. या सिलिंडरची नवी किंमत आता 2 हजार 355.50 रुपये झाली आहे. तत्पूर्वी, त्याची किंमत 2 हजार 253 रुपये होती. पाच किलोचा एलपीजी सिलिंडर सध्या 655 रुपयांना मिळत आहे.

हॉटेल्स, कॅटरिंग, मिठाईवाल्यांचे बजेट वाढले

हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवाले, कॅटरिंगवाले तसेच मिठाईवाल्यांकडून व्यावसायिक सिलिंडरचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. व्यावसायिक सिलिंडर महाग झाल्याने त्यांचे बजेटही वाढणार आहे. त्यांनाही खाद्यपदार्थ आणि मिठाईच्या दरांमध्ये वाढ करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्याची झळ सर्वसामान्यांनाही बसणार आहे. अनेक लोक जेवणासाठी हॉटेल- रेस्टॉरंटवर अवलंबून असतात.

दोन महिन्यांत व्यावसायिक सिलिंडरमध्ये 216 रुपये वाढ

गॅस सिलिंडरचे दर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत आहेत. महिनाभरापूर्वीच 1 एप्रिल रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये 250 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तत्पूर्वी, 1 मार्च रोजी सिलिंडरचे दर 105 रुपयांनी आणि त्याच्या वीस दिवसांनीच 22 मार्च रोजी पुन्हा त्यात 9 रुपयांनी वाढ केली गेली.

विमान प्रवास भाडय़ाचेही टेकऑफ

विमानांसाठी लागणाऱया इंधनाचे दरही आज 3.22 टक्क्यांनी वाढवण्यात आले. यंदाच्या वर्षीची ही नववी दरवाढ आहे. जागतिक बाजारपेठेत इंधन दरात वाढ झाल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगितले जाते. विमान उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या इंधनाच्या दरात प्रतिकिलोलिटरमागे 3649.13 रुपये वाढ झाली आहे. यापूर्वी 16 मार्च रोजी प्रतिकिलोलिटरमागे 17135.63 रुपये आणि 1 एप्रिल रोजी 2258.54 रुपये इतकी वाढ झाली होती. विमान इंधन दरात वाढ झाल्याने आता विमान प्रवासही महाग होणार आहे.