
पांढऱया रंगाची अर्माडा गाडी गर्दीतून वाट काढत व्यासपीठासमोर आली आणि त्यातून उतरले चक्क ‘धर्मवीर’ आनंद दिघे… तीच छबी, तोच रुबाब आणि तोच दरारा! टाळय़ांचा कडकडाट स्वीकारत आनंद दिघे व्यासपीठावर आले तेव्हा कॅमेऱयांचे प्लॅश लकाकले. ‘धर्मवीर’ पुन्हा एकदा अवतरला, चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चनिमित्ताने. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलखुलास दाद दिली… ‘शाब्बास, नाव राखलेत, एकनिष्ठता राखलीत!’
धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास म्हणजे एक धगधगते यज्ञकुंडच जणू! आज वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा अत्यंत दिमाखात साजरा झाला. या सोहळय़ाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ‘दबंग’ अभिनेता सलमान खान आवर्जून उपस्थित होते.
हॉटेलच्या त्या हॉलमधील वातावरण आज अक्षरशः भारावलेले होते. सदोदित वाजणारे ‘असा हा धर्मवीर’ हे थीमसाँग, व्यासपीठावरील चित्रपटाचे भव्य पोस्टर आणि राजकीय नेत्यांसह मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांची मांदियाळी असा हा भरगच्च सोहळा होता.
सुरुवातीला ठाणे जिह्याचे पालकमंत्री, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रास्ताविक करताना आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर मराठीतून भाषण करत सलमान खान याने रंगत आणली. आनंद दिघे यांचे लग्न झाले नव्हते आणि माझेही लग्न झालेले नाही असे सलमानने सांगताच सभागृहात एकच हंशा उसळला. मात्र सलमानच्या याच ‘साम्य’ स्थळाचा धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सलमान खान यांनी एक साम्य सांगितले नाही. ते म्हणजे सलमान आणि आनंद दिघे दोघेही ‘दबंग’… मात्र एक चित्रपटातील, तर दुसरा जीवनातील… तेव्हा टाळय़ांचा एकच कडकडाट झाला.
उपाधी जनता देते
त्यांना मिळालेल्या ‘धर्मवीर’ उपाधीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांना पदव्या, उपाध्या मिळाल्या. ‘हिंदुहृदयसम्राट’ असेल किंवा ‘धर्मवीर.’ अशा पदव्या मागून मिळत नाहीत. कोणत्या कॉलेजमधून मिळत नाहीत, तर जनतेने दिलेल्या असतात.
यावेळी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, खासदार श्रीकांत शिंदे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू, कृषिमंत्री दादा भुसे, आमदार सुनील प्रभू, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, अभिनेता रितेश देशमुख, शर्मन जोशी, अभिनेत्री अमिषा पटेल, गुलशन ग्रोव्हर यांच्यासह चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा प्रसाद ओक आदी उपस्थित होते.
शिवसेना संपवणारे संपले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, या चित्रपटाची ही झलक बघताना शिवसेना म्हणजे काय, शिवसैनिक म्हणजे काय ते पाहायला मिळते. गुरू आणि शिष्य हे नाते जपणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना संपवून शिवसेना पुढे गेली.
आनंद दिघे शंभर वर्षे जगले
आनंद दिघे मध्यरात्री दोन वाजताही शिवसैनिकांना कसे भेटायचे त्याचाही किस्सा मुख्यमंत्र्यांनी सांगितला. आनंद दिघे मध्यरात्री दोन-तीन वाजता शिवसैनिकांना भेटायचे, मग झोपायचे कधी असा प्रश्न मला पडायचा. आनंद दिघे यांचे निधन झाले तेव्हा ते पन्नास वर्षांचे होते. पण त्यांनी जनतेसाठी दिवसरात्र केलेल्या कामांचा विचार केला तर ते शंभर वर्षे जगले. ते केवळ जगलेच नाहीत, तर अनेकांना त्यांनी जगवले, जोपासले, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. हा चित्रपट केवळ चित्रपट म्हणून न पाहता निष्ठा म्हणजे काय असते त्याचे दर्शन घेण्यासाठी बघा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
































































