पश्चिम रेल्वेवरही एसी लोकलच्या फेर्‍यात लवकरच वाढ होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ac-local2

मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर येत्या 14 मे पासून वातानुकूलित लोकलच्या 44 वरून 56 फेर्‍या वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पश्चिम रेल्वेही आपल्या वातानुकूलित लोकलच्या फेर्‍या वाढविण्याच्या विचारात आहे. पश्चिम रेल्वेवर सध्या विरार ते चर्चगेट अशा एसी लोकलच्या 20 फेर्‍या होत असतात. त्यात आता आणखी 12 नव्या फेर्‍यांची भर पडणार असल्याने प्रवाशांचा प्रवास ‘थंडा थंडा कूल कूल’ होणार आहे.

रेल्वे बोर्डाने एसी लोकलच्या तिकीटदरात निम्म्याने कपात केल्याने मध्य रेल्वेने मुख्य मार्गावरील एसी लोकलच्या फेर्‍यांमध्ये 14 मेपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आता पश्चिम रेल्वेही आपल्या एसी लोकलच्या फेर्‍या वाढविण्याच्या तयारीत आहे. पश्चिम रेल्वेनेही लागलीच 12 नवीन एसी फेर्‍यांची भर पडणार आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात आणखी 16 एसी फेर्‍या चालविण्याची योजना पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनने आखली आहे. अशा आधीच्या 20 आणि नंतरच्या 28 फेर्‍या अशा एकूण 48 नवीन एसी फेर्‍या पश्चिम रेल्वेवर नव्या वेळापत्रकात दिसणार आहेत.

अशा वाढणार एसी लोकलच्या फेर्‍या
पश्चिम रेल्वेकडे सध्या तीन एसी लोकल वापरात असून एक एसी लोकल देखभाल दुरूस्तीसाठी कारखान्यात आहे. तसेच पश्चिम रेल्वेला आखणी एक एसी लोकल रेल्वे बोर्डाकडून मिळणार आहे. त्यामुळे नव्या फेर्‍यांची आखणी करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलची आधी दिवसाला दीड ते तीन हजार तिकीटे विकली जायची आता पाच हजारपेक्षा जास्त तिकीटांची विक्री होत आहे. त्यामुळे तातडीने 12 फेर्‍या वाढविण्यात येणार असून त्यात सहा डाऊन तर सहा अप फेर्‍यांचा समावेश असेल. त्यात चर्चगेट ते विरार दरम्यान पाच एसी लोकल फेर्‍या, अंधेरी ते विरार एक फेरी आणि विरार ते चर्चगेट पाच फेर्‍या तसेच भाईंदर ते चर्चगेट एक फेरी होणार आहे. प्रथम बारा फेर्‍या चालवल्या जातील आणि त्यानंतर नव्या वेळापत्रकात आणखी फेर्‍या चालवण्यासंदर्भात निर्णय होईल.