अभिप्राय – संमिश्र भावनांचा वानवळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • भीमराव गवळी

पल्लवी शिंदे-माने यांचा ‘मनस्विनी’ हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. पल्लवी यांचा हा पहिलावहिला काव्यसंग्रह आहे. या कवितासंग्रहाचं वैशिष्टय़ म्हणजे यात निव्वळ कविता नाहीत, तर कवितेबरोबरच काही ललित लेखांचाही यात समावेश आहे. या कवितासंग्रहात एकूण 28 कविता आहेत, तर 14 ललित लेख आहेत. कवितासंग्रहाचे दोन भाग करून पहिल्या भागात कविता आणि दुसऱया भागात ललित लेख देण्याचा धाडसी प्रयोग कवयित्रीने केला आहे. त्यामुळे वाचकांना एकाच पुस्तकात कविता आणि ललित लेख वाचण्याचा आगळावेगळा आनंद घेता येणार आहे.

पल्लवी यांच्या या कविता विशिष्ट अशा एखाद्या विषयाला वाहिलेल्या नाहीत. या संमिश्र अशा कविता आहेत. संमिश्र भावभावनांचा हा वानवळा आहे.

साध्यासोप्या भाषेतील कविता ही या कवितासंग्रहाची जमेची बाजू आहे. कवयित्रीने आपल्या कवितांमध्ये क्वचित प्रतिमांचा वापर केला आहे. त्यामुळे या कविता थेट मनाला भिडतात. पल्लवी या आपल्या कवितेतून थेट व्यक्त होतात. त्यांची कविता समाजातील व्यंगावर बोट ठेवते, जे आहे ते मांडते, पण कुठेही उपदेशाचे डोस देत नाही तसेच वाचकांवर समाजक्रांतीची जबाबदारी टाकून मोकळी होत नाही. उलट त्यांची प्रत्येक सामाजिक कविता वाचकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडते. इतक्या संवेदनशीलपणे त्यांनी या कविता लिहिल्या आहेत. प्रेमकवितेतून कवयित्री हळवी होते. त्यांच्या प्रेम कविता उत्कट आहेत, तितक्याच त्या मनातील अंतर्विरोध मांडणाऱया आहेत. निसर्ग कवितांमधून कवयित्री अधिक खुलताना दिसते. निसर्गाचं तरल वर्णन करण्यात कवयित्री यशस्वी ठरली आहे.

पल्लवी यांची कविता संवादी आहे. त्यांची ‘आई’ ही कविता त्याचं अप्रतिम उदाहरण आहे. या कवितेत त्या आईशी संवाद साधतात.

खमकेपणाने नेहमीच ठाम उभ्या असणाऱया.

तुझ्या अस्मानी नितळ रंगात,

तुझ्या डोळ्यातले अश्रू सरमिसळ करत राहतात

या कवितेतून आईची कणखरता अधोरेखित करतानाच मनातील दोलायमान स्थितीही कवयित्रीने नेमक्या शब्दांत पकडली आहे. ‘एकीकडे आई’ या कवितेतून हळुवारपणे व्यक्त होणारी कवयित्री ‘ती वयात येताना’ या कवितेत मात्र समाजातील दांभिकतेवर अत्यंत कठोर शब्दांत ओरखडे ओढते.

स्त्र्ायांच्या वेदना सांगूनच कवयित्री थांबली नाही तर माणसाच्या बेगडी स्वभावावर आणि जगण्यावरही कवयित्रीने भाष्य केलं आहे.

‘राधा’ या कवितेतून कवयित्री अतिशय हळुवारपणे व्यक्त होते. राधेचं कृष्णावरील अव्यक्त आणि निर्व्याज प्रेम मांडताना राधेची हतबलता आणि हताशताही या कवितेतून अधोरेखित होते. या नात्याला नाव नाहीये, पण प्रीत अमर आहे, निरागस आहे, असं सांगायलाही कवयित्री विसरत नाही. कवयित्री म्हणते,

जगण्यास व्यक्त होण्या, सूर सावळा बिलोरी,

दिसती असंख्य कान्हा, राधेस भास होई,

सांगू कुणास आपुले, नाते अनंत गहिरे,

दिसतात रुक्मिणीच्या, मुखी हताश पहारे

‘कातरवेळ’, ‘आजही’, ‘अपडेट’, ‘वटपौर्णिमा’, ‘पाऊसगाणे’, ‘तुझी याद’, ‘आधुनिक स्त्र्ााr’, ‘राधा’ आणि ‘गर्भाशय भाडय़ाने घेणे’ आहे या कवितांमधून कवयित्री दमदारपणे व्यक्त होते. दुःख, वेदना, प्रेमाची अनामिक ओढ आणि काहीतरी गमावल्याची सल पल्लवी यांच्या कवितेतून सतत दिसून येते. त्यामुळे हा कवितासंग्रह वाचल्यानंतर अंतर्मुख व्हायला होतं.

 

मनस्विनी

कवयित्री ः पल्लवी शिंदे-माने

प्रकाशक ः अष्टगंध

मूल्य ः रुपये 150/-

 

स्वागत

 

शिरच्छेद, फाशी आणि आल्बेर काम्यूचा चिंतननामा

अनुवाद ः शेखर देशमुख

प्रकाशन ः लोकवाङ्मय गृह

 

मुलाखत एन. डी. पाटील

लेखक ः किशोर बेडकिहाळ

प्रकाशन ः लोकवाङ्मय गृह

पृष्ठs ः 80, मूल्य ः रुपये 100/-

 

क्रांतीवीर भगतसिंग

लेखक ः डॉ. अशोक भाईडकर

प्रकाशक ः डिंपल पब्लिकेशन

पृष्ठs ः 80, मूल्य ः रुपये 150/-

 

त्यातली मी एक

लेखिका ः गवळण कलकत्ते

प्रकाशक ः डिंपल पब्लिकेशन

पृष्ठs ः 54, मूल्य ः रुपये 100/-

 

वारसा अतिताचा

लेखक ः पंकज समेळ

प्रकाशक ः मेरवान टेलॉजी

पृष्ठs ः 272, मूल्य ः रुपये 325/-

 

अज्यात मज्यात पिंटूच्या राज्यात

लेखिका ः मेघना साने

प्रकाशक ः व्यास क्रिएशन्स्

पृष्ठs ः 40, मूल्य ः रुपये 70/-