पर्यटकांच्या गर्दीने महाबळेश्वर फुलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग आलेल्या सुट्टय़ांमुळे महाराष्ट्राचे ‘मिनी कश्मीर’ म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले आहे. निसर्गरम्य पर्यटनस्थळांसह सायंकाळी नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा लेकवर गर्दी होत आहे. तसेच मुख्य बाजारपेठेतही खरेदीसाठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे पर्यटकांना वाहतूककाsंडीचा सामना करावा लागत आहे.

उन्हाळी हंगाम आणि सलग आलेल्या सुट्टय़ांमुळे महाबळेश्वर व पाचगणी ही पर्यटनस्थळे बहरली असून गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वरसह परिसर धुक्यात हरवल्याचे चित्र होते. या बदललेल्या वातावरणामुळे पर्यटकांना पावसाळ्यातील महाबळेश्वरची अनुभूती मिळत आहे.

महाबळेश्वरचे मुख्य आकर्षण असलेल्या ऑर्थरसीट पॉइंटसह पौराणिकदृष्टय़ा महत्त्वाचे असलेले श्रीक्षेत्र महाबळेश्वर, शूटिंगसाठी प्रसिद्ध असलेला केट्स पॉइंट, तसेच पश्चिम घाटाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी प्रसिद्ध लॉडविक व एलिफंट हेडसोबतच सायंकाळी मुंबई पॉइंट येथे सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.