
‘धर्मवीर’ चित्रपट तिकीट खिडकीवर प्रचंड गर्दी खेचतो आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनीही हा सिनेमा आवर्जून पाहिला. सिनेमा पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या सिनेमात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱया प्रसाद ओकची तारीफ तर केलीच, पण प्रत्येक शहरात एक आनंद दिघे पाहिजे. म्हणजे मग त्या शहरातील गुंडापुंडांना धाक राहील आणि माताभगिनींचे रक्षण होईल, अशी प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे यांनी ‘धर्मवीर’ या चित्रपटाचे कौतुक करताना सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहनही केले. मात्र चित्रपट चालावा म्हणून हे आवाहन करीत नसून आयुष्य जगावे कसे हे शिकवणारा ‘आनंद दिघे’ नावाचा एक ‘धर्मवीर’ होता ते पाहण्यासाठी थिएटरमध्ये जा, असे आपल्याला सांगायचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, अभिनेता प्रसाद ओक आदी उपस्थित होते.
गुरू-शिष्याचे नाते
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे गुरू-शिष्याचे नाते होते. ते नाते आता अधिकच घट्ट झाल्याचे जाणवते आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिक कसा असावा, तो कसा झोकून देऊन काम करतो, धर्मनिष्ठा, संघटना आणि जनतेवर प्रेम करणारे कार्यकर्ते या सर्वांचे उत्तम मिश्रण म्हणजे हा सिनेमा आहे. आपण चित्रपट पाहतो आहोत असे कुठेच वाटत नाही आणि हेच या चित्रपटाचे यश आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.






























































