
हिंदुस्थानच्या जुनियर नेमबाजांनी जर्मनीत सुरू असलेल्या जुनियर विश्वचषक नेमबाजीत पदकांची लयलूट करीत आपले जोरदार वर्चस्व सिद्ध केले आहे. सिफ्ट कौरने आज महिलांच्या 50 मीटर राइफल थ्री पोजिशन (3 पी) प्रकारचे सुवर्णपदक पटकावत हिंदुस्थानी सुवर्णपदकांची संख्या 10 वर नेली. त्यामुळे पदकतालिकेत हिंदुस्थान एकूण 26 पदके जिंकून टॉपच्या स्थानावर आहे.
सिफ्ट कौर सामराने 50 मीटर रायफल 3 पोजिशन प्रकारात नॉर्वेच्या जुली जोहानसनला 17-9 असे सहज पराभूत करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अनीशने रौप्यपदक तर विजयवीरने कांस्यपदक पटकावले.
पुरुषांच्या थ्री पोजिशन सांघिक प्रकारात हिंदुस्थानी संघाला कांस्यपदकाची कमाई झाली. या प्रकारात शिवम डबास, पंकज मुखेजा आणि अविनाश यादव हिंदुस्थानी संघात होते. पुरुषांच्या रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात फ्रान्सच्या यान चेसनेल याने सुवर्णपदक पटकावले. हिंदुस्थानच्या अनीशला 28 गुणांसह रौप्यपदक आणि विजयवीरला 18 गुणांसह कांस्यपदक पटकावता आले.
पदकतालिकेत हिंदुस्थान टॉपवर
हिंदुस्थानी नेमबाजांनी यंदाच्या जुनियर विश्वचषक नेमबाजीत 10 सुवर्णपदके, 12 रौप्यपदके आणि 4 कास्यपदके अशी एकूण 26 पदके मिळवत पदकतालिकेत आपले टॉपचे स्थान कायम राखले आहे. इटली 7 पदकांसह दुसऱया तर फ्रान्स 6 पदकांसह तिसऱया स्थानावर आहे. इटलीने 4 तर फ्रान्सने 2 सुवर्णपदकांची कमाई आतापर्यंत केली आहे.































































