
बेस्टच्या कंत्राटी बस चालकांनी त्यांच्या मालकाने पगार थकविल्याने विक्रोळी, कुर्ला आणि वांद्रे डेपोत अचानक ‘काम बंद’ आंदोलन करीत संप पुकारल्याने मंगळवारी प्रवाशांना फटका बसला. त्यामुळे बेस्टने आपल्या मालकीच्या बसेसच्या जादा फेऱया चालवून दिलासा दिला. संबंधित कंत्राटदारावर बेस्ट प्रशासनाने याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे.
बेस्टच्या कंत्राटदारांनी गेल्या काही महिन्यांत सलग चौथ्यांदा ‘काम बंद’ आंदोलन केल्याचा प्रकार उघडकीस आला. आहे. बेस्ट विक्रोळी, कुर्ला आणि वांद्रे येथील डेपोतील 275 पैकी 163 मिनी बस त्यामुळे रस्त्यावर येऊ शकल्या नाहीत. सायंकाळी उशिरापर्यंत हा संप कायम होता, त्यामुळे बेस्टने स्वतःच्या ताफ्यातील 64 बसेस आधारे सेवा देण्याचे काम केले.
कंत्राटदारावर दर फेरीमागे पाच हजारांचा दंड
बेस्टच्या ताफ्यात भाडय़ाच्या कंत्राटी बस घेण्यात आल्या असून त्याच्या चालकांना वेतन व इतर फायदे देण्याची जबाबदारी मालकांकडे आहे. बेस्ट प्रशासन दर कि.मी.मागे या कंत्राटदारांना ठरावीक पैसे देत असते; परंतु मालकांनी कर्मचाऱयांचा पगार थकविल्याने चालकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे. याप्रकरणी प्रत्येक न धावलेल्या फेरीबद्दल प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड कंत्राटदारावर करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.


























































