
पाकिस्तानी हेरसंस्था आयएसआयकडून जम्मू-कश्मीरमधील जिहादींना भडकावून सीमेवर मोठा घातपात करण्याचा कट रचला जात आहे. त्यासाठी अफगाणिस्तानातून लुटलेल्या अमेरिकन शस्त्रास्त्रांचा वापर केला जाऊ शकतो, असा इशारा सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक पंकज कुमार सिंह यांनी दिला आहे.
निमलष्करी दलाच्या 57 व्या स्थापना दिवसाच्या पूर्वसंध्येला पंकज सिंह यांनी हा गंभीर इशारा दिला आहे. ‘तालिबानी सैनिक आता मोकळेच आहेत आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रेही आहेत. त्यामुळे हा चिंतेचा विषय आहे, मात्र बीएसएफ पूर्णपणे सज्ज आहे आणि इतर सुरक्षा संस्थांशी सातत्याने संपर्कात आहे,’ असे सिंह यांनी म्हटले आहे.
‘या वर्षी आतापर्यंत पाकिस्तानलगतच्या पश्चिम सीमेवर हेरगिरी करणारे 67 ड्रोन दिसून आले. हे सर्व ड्रोन चिनी बनावटीचे आहेत. बहुतांश ड्रोन्सचा वापर हा ड्रग्ज वाहतुकीसाठी केला जात आहे. आतापर्यंत आम्ही पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडले आहेत. अनेकदा शस्त्रास्त्रेही पकडली गेली,’ असे महासंचालक सिंह यांनी सांगितले.
























































