नवव्या सुप्रिमो चषकाचा सुपर धमाका आजपासून, रोज 25 ते 30 हजार क्रिकेटशौकीन उपस्थिती लावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने 2010मध्ये सुरू झालेल्या सुप्रिमो चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेने आता लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. यंदाच्या नवव्या सुप्रिमो चषक स्पर्धेचा सुपर धमाका उद्या मंगळवारपासून 24 मे ते शनिवार 28 मे 2022 या कालावधीत रंगणार आहे. देशातील 16 नामवंत क्रिकेट संघ या स्पर्धेच्या मानाच्या जेतेपदासाठी कलिना येथील एअर इंडिया स्पोर्टस् क्लब मैदानावर झुंजणार आहेत. या स्पर्धेसाठी एअर इंडिया क्रीडांगण अगदी नववधूसारखे नटले आहे. मंगळवारी सायंकाळी 7 वाजता मुंबईकर क्रिकेटशौकिनांसाठीच्या या क्रिकेट कार्निव्हलचे जल्लोषात उद्घाटन होणार आहे.

सुप्रिमो स्पर्धेची प्रेक्षक गॅलरी, हिरवेगार मैदान, मैदानाभोवती केलेली सजावट आणि रोषणाईच्या दर्शनासाठी आसुसलेले क्रीडाशौकिनांचे डोळे उद्या नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्याने आणि स्पर्धेच्या हायटेक संयोजनाने पार सुखावून जाणार आहेत. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सुमारे 22 देशांत यू टय़ुबवरून केले जाणार आहे. सुप्रिमो फाऊंडेशनचे प्रमुख महाराष्ट्राचे परिवहन आणि संसदीय कामकाजमंत्री ऍड. अनिल परब आणि कलिना विधानसभेचे शिवसेना आमदार विभागप्रमुख संजय पोतनीस यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते आणि शिवसैनिक स्पर्धेच्या यशस्वितेसाठी झटताना दिसत आहेत. रोज या स्पर्धेला उपस्थित राहणारे 20 ते 30 हजार क्रिकेटशौकीन यंदाही नवव्या सुप्रिमो चषक स्पर्धेचा आनंद मनमुरादपणे लुटण्यासाठी आतुर झाले आहेत.

सुप्रिमो चषक टेनिस क्रिकेट स्पर्धा आता देश-विदेशातील क्रिकेटशौकिनांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. भव्यदिव्य आणि नेटके संयोजन, स्पर्धेत हायटेक सुविधांचा वापर आणि स्पर्धेतील विजेत्या संघांवर होणारा रोख महापारितोषिकांचा वर्षाव यामुळे नवव्या वर्षात पदार्पण करणारी सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धा टेनिस क्रिकेटची आयपीएल म्हणून देश-विदेशात परिचित झाली आहे. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अत्यंत आवडती टेनिस क्रिकेट स्पर्धा आज क्रिकेटजगतात प्रतिष्ठsची स्पर्धा म्हणून गणली जात आहे. त्यामुळेच मुंबईकर क्रिकेट शौकिनांना या स्पर्धेची प्रतीक्षा दरवर्षी लागलेली असते. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे स्पर्धेच्या आयोजनात खंड पडला होता, पण ती उणीव आता नवव्या सुप्रिमो चषक स्पर्धेच्या धडाकेबाज आयोजनाने भरून काढण्याचा निश्चय स्पर्धेच्या संयोजकांनी व्यक्त केला आहे.

यंदा हे 16 नामवंत संघ सहभागी

यंदाच्या नवव्या सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेत पिरामीटर वैष्णवी इलेव्हन (रायगड), शिरसाट स्पोर्टस्ॊाd (नगर), टीडब्ल्यूजे इलेव्हन (पालघर ), रोहित क्रिकेटर्स (वास्को, गोवा), डिंगडाँग (पुणे), एकता (गुजरात), अँजेल स्पोर्ट्स् (कोलकाता), विक्रोळीयन्स (मुंबई), उमर इलेव्हन (ट्रायडेंट, नवी मुंबई), बंगाल ब्रदर्स (कोलकाता), एफ. एम. इलेव्हन (होस्पेट, कर्नाटक) उमेश इलेव्हन (वरळी, मुंबई), ए. के. स्टार (राजकोट), सँडी एसपी, कंधारी किंग्स (मुंबई ), शांतिरत्न (डोंबिवली) हे संघ सहभागी होणार आहेत. 27 मेपर्यंत या 16 संघातून विजयी होणाऱया 8 संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळेल. अंतिम फेऱयांचा कार्यक्रम नंतर ठरवण्यात येणार आहे.

स्पर्धेतील निर्णयासाठी भव्य रिह्यूप्रणाली

सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेतील पंचांचे निर्णय पुन्हा तपासण्याची संधी सहभागी संघांना हायटेक रिह्यूप्रणालीने मिळणार आहे. स्टेडियमवर लावलेला 20 बाय 45 फुटांचा भव्य एलईडी जायण्ट क्रीनवर खेळाडू आणि परीक्षकांना यंदा खेळाडू नक्की बाद की नाबाद हे पाहता येणार आहे. मैदानात लावलेले 15 कॅमेरे वेगवेगळय़ा अँगलमधून रिह्यूसाठीची छायाचित्रे घेणार आहेत. शिवाय स्पर्धेचे ओघवते धावते समालोचन आणि रोषणाई हे यंदाही मोठे आकर्षण ठरणार आहे. स्टेडियमवर सर्वत्र लावलेल्या भगव्या ध्वजांमुळे स्पर्धेचे वातावरण भगवेमय झाले आहे.

या संघांना आतापर्यंत मिळालाय जेतेपदाचा बहुमान

स्टार क्रिकेट क्लब (2010), राजेंद्र इलेव्हन, सांताक्रुझ (2011), विनर स्पोर्टस् क्लब, नालासोपारा (2012), वेदांत, वाडा (2013), विजयदुर्ग एसपी (2015), मराठा पंजाब (2016), ट्रायडंट उमर इलेव्हन (2017) आणि विनर स्पोर्टस् मराठा पंजाब (2018) या संघांनी आतापर्यंत सुप्रिमोच्या जेतेपदाचा बहुमान पटकावला आहे. यंदा विजेत्या संघाला झळाळत्या रौप्य चषकासह रोख 9 लाख रुपये, उपविजेत्याला 7  लाख रुपये असे महापारितोषिक देण्यात येणार आहे.

10 नामवंत समालोचक समालोचन करणार

सुप्रिमो चषक क्रिकेट लढतीचे समालोचन आयपीएलमध्ये मराठी आणि अन्य भाषांतून समालोचन करणारे 10 नामवंत समालोचक करणार आहेत. शिवाय आंतराष्ट्रीय दर्जाचे 6 पंच आणि 4 रेफरी स्पर्धेत पंच म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेची रंगत अधिकच वाढेल. असा संयोजकांना विश्वास आहे.

विजेत्यांना मिळणार झळाळता चांदीचा चषक

यंदा विजेत्या संघाला शुद्ध 99 टक्के चांदी आणि ग्रॅफाइट यांच्या संयोगातून बनवलेला झळाळता रौप्यचषक बहाल करण्यात येणार आहे. आंतराष्ट्रीय फुटबॉल आणि क्रिकेट स्पर्धेच्या धर्तीवर इटालियन तंत्राने 8 हिटिंग प्रक्रियेतून गेलेल्या भव्य चषकावर 99 टक्के चांदीचा मुलामा देण्यात आलेला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे या चषकाची झळाळी आणि चमक कायम टिकून राहणार आहे. या चषकाची जडणघडणही आंतराष्ट्रीय तंत्राने करण्यात आल्याचे संयोजक संजय पोतनीस यांनी स्पष्ट केले.