श्रीगोंदा पालिकेने शहरातील अतिक्रमणांवर फिरविला जेसीबी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीगोंदा शहरातील अनेक वर्षांपासूनची अतिक्रमणे नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या आदेशाने तसेच चोख पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. या कारवाईत टपऱया तसेच पक्के बांधकाम काढून टाकण्यात आले. यामुळे अतिक्रमणधारकांची एकच तारांबळ उडाली.

श्रीगोंदा नगरपालिका हद्दीतील श्रीगोंदा – काष्टी रस्ता, मांडवगण रस्ता, बसस्थानक परिसर, पेडगाव रस्ता, शनिचौक ते बगाडे कॉर्नर रस्ता, वडाळी रस्ता अशा मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना अतिक्रमणधारकांना वर्तमानपत्रात जाहीर नोटीसद्वारे चार दिवसांपूर्वी देण्यात आल्या होत्या. बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास नायब तहसीलदार पंकज नेवसे, मुख्याधिकारी मंगेश देवरे हे पालिकेच्या सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्यासह 6 पोलीस अधिकारी, 60 कर्मचारी आणि राज्य राखीव दलाची एक तुकडी, पाच जेसीबी, अग्निशामक दल आदींच्या मदतीने रस्त्यावरील टपऱया, पक्के बांधकाम केलेली दुकाने पडण्यास सुरुवात केली.