
राष्ट्रपती पुरस्कार विजेते, ज्येष्ठ लोककलावंत, विनोदसम्राट दादू इंदूरीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी राज्याच्या सहा महसूल विभागांत लोकनाट्य, तमाशा, वगनाट्यांचे प्रयोग आयोजित करावेत तसेच लोककला जतन-संवर्धनासाठी चर्चासत्रे आयोजित करण्यात यावीत, अशी मागणी विनोदसम्राट दादू इंदूरीकर लोककला प्रतिष्ठानच्यावतीने सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे करण्यात आली आहे.
प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने संचालक बिभीषण चवरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात “गाढवाचं लग्न” हे वगनाट्य दिवंगत दादू इंदूरीकर यांनी अजरामर केले. इंदुरीकर यांचा जन्मशताब्दी सोहळा सुरू झाला आहे. त्याचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य विभागाने प्रत्येक महसूली विभागात “गाढवाचं लग्न” या वगनाट्याचा प्रयोग करावा. त्याचप्रमाणे लोककलेच्या इतिहासाला उजाळा मिळण्याकरिता परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करावीत, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, प्रतिष्ठानने या संदर्भात कार्यक्रमाची रुपरेषा ठरवून प्रस्ताव सादर करावा. सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असे सांस्कृतिक विभागाने म्हटले आहे. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रकाश खांडगे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, संजय चव्हाण, सचिव प्रभाकर ओव्हाळ, कोषाध्यक्ष अॅड. रंजना भोसले, विश्वस्त राजेंद्र सरोदे, ज्ञानेश महाराव, सोपान खुडे, खंडूराज गायकवाड आदी उपस्थित होते.

























































