लोनच्या नावाखाली बदनामी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झटपट लोनवसुलीच्या नावाखाली नागरिकांच्या बदनामीचे प्रकार वाढतच चालले आहेत. कर्जवसुलीच्या नावाखाली फर्निचर व्यावसायिक आणि पत्रकाराचा मॉर्फ फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना घडली आहे. घडल्याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात आणखी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे.

तक्रारदार हे मालाड येथे राहत असून त्याचा फर्निचरचा व्यवसाय आहे. 7 मे रोजी त्यांना मोबाईलवर लोन ऍपबाबत एक लिंक आली. त्या लिंकवर क्लिक केल्यावर ‘बडी कॅश’ हे ऍप डाऊनलोड झाले. तक्रारदार याने व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, फोटो आणि बँक खात्याची माहिती दिली. तक्रारदार याने तेव्हा कोणत्याही लोनची मागणी केली नव्हती. 19 मे रोजी तक्रारदार यांना मोबाईलवर कर्ज परत करण्याबाबतचा मेसेज आला. कर्जवसुलीसाठी तक्रारदार यांना फोनवरून धमकी देऊन अश्लील भाषेत शिवीगाळ केली जात होती. फोनच्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने सुरुवातीला साडेतीन हजार रुपये भरले. पैसे भरल्यानंतर तक्रारदाराकडे पुन्हा पैशाची मागणी करण्यात आली.

वारंवार ठग हे तक्रारदाराला फोन करून पैशासाठी धमकावत होते. शनिवारीदेखील एका ठगाने तक्रारदाराला फोन केला. जरसहा हजार रुपये भरले नाही तर बदनामी करू अशी धमकी दिली. पैसे न भरल्याने ठगाने तक्रारदाराच्या एका नातेवाईकाला मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवून पैसे भरण्यास सांगितले. 16 हजार 964 रुपये भरूनदेखील बदनामी सुरु असल्याने तक्रारदार याने अखेर कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. ही घटना ताजी असतानाच आणखी एका पत्रकाराच्या बदनामीचा प्रकार समोर आला आहे. बारा दिवसांपूर्वी तक्रारदारांना मोबाईलवर एक लिंक आली. त्यानेदेखील लिंकवर क्लिक केल्यावर ‘कॅश ऍडव्हान्स 1’ हे ऍप डाउनलोड झाले. व्हेरिफिकेशन झाल्यावर तक्रारदारांच्या खात्यात 2 हजार 277 रुपये जमा झाले. त्यानंतर तक्रारदारांना कर्जवसुलीसाठी वारंवार फोन येऊ लागले. ठगाने तक्रारदारांच्या तीन मित्राच्या मोबाईलवर मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवून कर्ज फेडण्यास सांगितले. कर्जाची मुदत संपण्यापूर्वीच ठग हे वारंवार फोन करून कर्ज फेडण्यासाठी त्रास देत होते. घडल्याप्रकरणी तक्रारदाराने कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. कुरार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.