जालन्यात कार-दुचाकीचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना रोडवरील जालना- नाव्हा रोडवर कार आणि दुचाकीचा गंभीर अपघात झाला. त्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर मोटार सायकलनेही पेट घेतल्याने मोटारसायकल जळून खाक झाली आहे. कारचालक कार जागेवरच सोडून फरार झाला आहे.

जालना तालुक्यातील बोरखेडी येथील पंडीत रंगनाथ बोरूडे यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या ज्ञानेश्वर संपतराव बोरुडे (रा. बोरखेडी) यांना जालना येथील खाजगी रूग्णालयात नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये दुचाकीला आग लागल्याने दुचाकी जळून खाक झाली आहे. बोरखेडी गावातील दोन जणांचा अपघातात मृत्यू झाल्याने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे बीट जमादार रामेश्वर काकड, पोलीस हेडकॉन्स्टेबल जारवाल, प्रवीण टेकाळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून दोन मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

दुचाकीने घेतला पेट
कार व दुचाकीचा अपघातानंतर दुचाकी दूरपर्यंत घसरत गेल्याने दुचाकीने पेट घेतला तर कारचालक कार सोडून पसार झाला आहे.