फाईव्ह–जीमुळे काय बदलेल?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • महेश कोळी

काही देशांत फाईव्ह-जी तंत्रज्ञान आधीपासूनच कार्यरत आहे, परंतु त्या देशांमध्ये, अगदी अमेरिकेतसुद्धा फाईव्ह-जीमुळे अपेक्षित असलेले बदल अद्याप घडून आलेले नाहीत. फाईव्ह-जी नेटवर्क फोर-जीच्या तुलनेत खूपच गतिमान आहे हे खरे, परंतु फाईव्ह-जीमुळे लोकांच्या जीवनमानात होणाऱ्या बदलांची अद्याप प्रतीक्षाच केली जात आहे. आव्हाने बरीच आहेत आणि त्यांचा मुकाबला आपण करू शकलो नाही तर आपल्याकडे तंत्रज्ञान असेल, पण वापरकर्ते फारसे नसतील.

केंद्रीय रेल्वे, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 20 मे रोजी आयआयटी, चेन्नईने देशी तंत्रज्ञानाने तयार केलेल्या एका ट्रायल नेटवर्कवरून देशातील पहिला फाईव्ह-जी कॉल केला. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी, चेन्नई येथे हिंदुस्थानातील पहिल्या फाईव्ह-जी टेस्ट बँडचे उद्घाटन केले होते. स्टार्टअप्स आणि उद्योजक यांना स्थानिक पातळीवर आपल्या उत्पादनांची चाचणी घेणे शक्य व्हावे आणि परदेशी उत्पादनांवरील आपले अवलंबित्व कमी व्हावे, असा या बँडचा उद्देश आहे. अर्थातच, फाईव्ह-जीची तयार उपकरणे आणि नेटवर्क यांच्यासाठी आता परदेशांतून मंजुरी घेण्याची गरज नाही. देशातच त्याचे प्रमाणीकरण केंद्र आहे आणि फाईव्ह-जी नेटवर्कच्या शर्यतीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व हिंदुस्थानी कंपन्यांना त्याचा लाभ घेता येईल.

सर्वसामान्य मोबाईल आणि इंटरनेट ग्राहकांसाठी फाईव्ह जी हे वायरलेस तंत्रज्ञानाचे पाचव्या पिढीचे माध्यम असून फोर-जीच्या तुलनेत अधिक वेग आणि क्षमता ते मोबाईलधारकांना प्रदान करेल. हे आतापर्यंतचे सर्वात मजबूत आणि गतिमान तंत्रज्ञान आहे. फाईव्ह-जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा वेग आणखी वाढेल. त्यामुळे डाऊनलोडिंगला कमी वेळ लागेल. यात वेब पेज लोड करण्यासाठी कमी वेळ लागेल आणि आपले जीवन, व्यवसाय आणि काम करण्याच्या पद्धती, सर्वकाही बदलून जाईल. फाईव्ह-जी आल्यानंतर आपले तंत्रज्ञान सर्व वस्तूंना एकमेकांशी जोडेल. घर, चालकविरहित कार, स्मार्ट ऑफिस, स्मार्ट सिटी आणि उन्नत आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टी परस्परांशी जोडल्या जातील. अनेक अर्थांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने जे अशक्य आणि उन्नत बदल आपण इच्छितो, ते सर्व फाईव्ह-जी नेटवर्कमुळे शक्य होतील.

गेल्या सुमारे तीस वर्षांमध्ये वायरलेस तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बरेच रूपांतरण झाले आहे. वन-जीच्या सुरुवातीच्या दिवसांत जो ऍनलॉग सेल्युलर होता आणि केवळ आवाज इकडून तिकडे पोहोचविणे हाच ज्याचा प्राधान्यक्रम होता. त्याचे एकमेव वैशिष्टय़ म्हणजे, कोणत्याही केबलचा वापर न करता आवाज दुसरीकडे पोहोचत होता. हे नेटवर्क बरेच दिवस तसेच राहिले. नंतर टू-जी नेटवर्क आले. आवाजाबरोबरच काही आकडेही या नेटवर्कच्या माध्यमातून इकडून तिकडे जाऊ शकत असत. म्हणजेच टू-जी नेटवर्कमध्ये संभाषणाच्या बरोबरीने एसएमएसचीही सुविधा होती. त्यानंतर थ्री-जी आणि फोर-जी नेटवर्क आले. हे फोन अद्याप वापरात आहेत. हे मोबाईलमधील एक मोठे रूपांतरण होते आणि याद्वारे फोटो आणि व्हिडीओ पाठवणे, डाऊनलोड करणे शक्य झाले होते. त्याचबरोबर मोबाईलमध्ये विविध ऍप्स या काळात निर्माण झाले आणि त्यांनी आपले जगच बदलून टाकले.

आपल्याच देशाबद्दल बोलायचे झाल्यास फाईव्ह-जी स्पेक्ट्रममध्ये संचालित होण्यासाठी फाइव्ह-जी टेलिकॉम लायसेन्सच्या प्रक्रियेवर अद्याप काम सुरूच आहे. व्होडाफोन-आयडिया, जिओ आणि एअरटेल फाईव्ह-जी नेटवर्कच्या आपापल्या नेटवर्कची क्षमता अद्याप पारखून पाहत आहेत. या वर्षाअखेरीस काही महत्त्वाच्या शहरांमध्ये फाईव्ह-जी नेटवर्कचे आगमन होणार असले तरी मानवी जीवनावरील त्याचा परिणाम जाणून घेण्यासाठी आपल्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दूरसंचार विभागाने असे स्पष्ट केले आहे की, या वर्षी फाईव्ह-जी नेटवर्क लाँच होईल. परंतु सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये ते कार्यान्वित केले जाणार आहे. त्यानंतर काही काळाने देशातील इतर रहिवाशांना या नेटवर्कचा लाभ घेणे शक्य होणार आहे. फाईव्ह-जी आणि त्यापाठोपाठ येत असलेले सिक्स-जी नेटवर्क हिंदुस्थानात अनेक बदल घडवून आणेल हे निश्चित, परंतु सर्वच लोकांना या नेटवर्कचा लाभ घेणे शक्य होणार नाही. ज्या उपकरणांमध्ये फाईव्ह-जी तंत्रज्ञानाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो, अशा उपकरणांपैकी बहुसंख्य उपकरणे हिंदुस्थानात तयार होतच नाहीत. म्हणजेच, अशा स्थितीत फाईव्ह-जी नेटवर्कवर चालणाऱ्या गॅजेट्ससाठी आपल्याला परदेशांवर अवलंबून राहावे लागणार. उदाहरणार्थ, ऍप स्टोअर आणि ऍपल स्टोअर अशा दोन्ही प्रमुख प्लॅटफॉर्मसाठी सॉफ्टवेअर विकसित करणे आणि त्याची चाचणी करण्यासाठी अनेक टेस्टिंग रूम्सची आवश्यकता असेल.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात, विशेषतः विमानतळ, रुग्णालये आणि डाटा संकलनात फाईव्ह-जी तंत्रज्ञान मोठी भूमिका बजावेल, असे सांगितले जाते. वायरलेस तंत्रज्ञानाची पुढील पिढी केवळ फोनपर्यंत सीमित राहणार नाही. अशा स्थितीत, त्यास अनुसरून नेटवर्क, त्याअनुरूप उपकरणे आणि त्याअनुरूप ऍप्ससाठी खर्च करावा लागेल. हिंदुस्थानची विशाल लोकसंख्या आणि इंटरनेट तसेच डेटाविषयक मोठय़ा गरजा लक्षात घेता, जागतिक दूरसंचार स्पर्धेत हिंदुस्थान निश्चित सहभागी आहे. अशा स्थितीत फाईव्ह-जी आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचे परीक्षण करण्याची प्रणाली आणि पर्यावरण आपल्याकडे असायला हवे हेच खरे. या सर्व बाबींसाठी वेळ लागेल, परंतु फाईव्ह-जीचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना खर्च करावा लागेल. टेलिकॉम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा जागतिक बाजार निवडक देशांच्या निवडक कंपन्यांकडे एकवटलेला आहे. या देशांमध्ये हिंदुस्थानचा समावेश नाही.

भविष्यात हिंदुस्थान फाईव्ह-जी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या देशांमध्ये अग्रणी असेल याची शक्यता आहे; पण फाईव्ह-जी तंत्रज्ञानाचे विकास केंद्र म्हणून हिंदुस्थान जागतिक बाजाराला आकर्षित करू शकेल की नाही, हे काळच ठरवेल. ज्या कंपन्या फाईव्ह-जी नेटवर्कची सेवा सुरू करणार आहेत, त्यांना पायाभूत संरचनेवरही खर्च करावा लागेल, जेणेकरून त्यांची सेवा संपूर्ण देशात एकसारखीच असावी आणि मोबाईल तसेच अन्य उपकरणे त्यावर व्यवस्थित चालावीत. या आव्हानांना आपण तोंड देऊ शकलो नाही, तर आपल्याकडे तंत्रज्ञान तर असेल; परंतु त्याचा वापर करणारे लोक जास्त नसतील.

वायरलेस तंत्रज्ञानाच्या प्रत्येक पिढीने ग्राहकांना काहीना काही नवीन सेवा प्रदान केल्या. फाईव्ह-जी तंत्रज्ञानही ग्राहकांना बरेच काही नवे देणार आहे. अर्थात फाईव्ह-जीचे तंत्रज्ञान आणि त्याचा अनुभव यात फरक आहे. उदाहरणार्थ, काही देशांत फाईव्ह-जी तंत्रज्ञान आधीपासूनच कार्यरत आहे, परंतु त्या देशांमध्ये, अगदी अमेरिकेतसुद्धा फाईव्ह-जीमुळे अपेक्षित असलेले बदल अद्याप घडून आलेले नाहीत. फाईव्ह-जी नेटवर्क फोर-जीच्या तुलनेत खूपच गतिमान आहे हे खरे, परंतु फाईव्ह-जीमुळे लोकांच्या जीवनमानात होणाऱ्या बदलांची अद्याप प्रतीक्षाच केली जात आहे. आव्हाने येथेच संपत नाहीत. उदाहरणार्थ, फाईव्ह जी नेटवर्क केवळ येऊन उपयोग नाही, तर आपल्याकडे खास त्या तंत्रज्ञानाला साजेसा मोबाईल असणेही गरजेचे आहे. अर्थातच, यामुळे बाजारात फाईव्ह-जी तंत्रज्ञान असलेले असंख्य मोबाईल येतील आणि ग्राहकांना त्यांची अव्वाच्या सव्वा किंमतही मोजावी लागेल.

(लेखक संगणक अभियंता आहेत.)