
मोबाईल रेशनिंग व्हॅनला बंदी घातल्यामुळे शिवडी कोळीवाड्यातील शिधावाटप केंद्र दुसरीकडे हलवण्यात आले होते. त्यामुळे शिवडी कोळीवाड्यातील शेकडो कुटुंबीयांना महिन्याचे रेशनिंग घेण्यासाठी रेल्वे फाटक ओलांडून, जीव धोक्यात घालून जावे लागत होते. रहिवाशांची ही समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी रेशनिंग अधिकार्यांकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून शिवडी कोळीवाडा येथे नवीन दुकानात शिधावाटप केंद्र सुरू करण्यात आले. त्यामुळे कोळीवाड्यातील शेकडो कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
शिवडीतील प्रभाग क्रमांक 206 (214) मधील शिवडी कोळीवाडा, गिरीनगर, इंदिरानगर रामगड राजीव गांधीनगरमधील सुमारे 1500 कुटुंबीयांचे रेशन शिधावाटप गेली कित्येक वर्षांपासून कोळीवाडा येथे मोबाईल रेशनिंग व्हॅनमध्ये मिळायचे. परंतु आता सरकारने मोबाईल रेशनिंग व्हॅनला बंदी घातली आहे. त्यामुळे या कुटुंबीयांचे रेशनिंग शिवडी पश्चिम येथील शिवडी क्राॅस रोड येथे करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे फाटक ओलांडून जावे लागत होते. त्यात शिवडी रेल्वे फाटक हे सकाळी साडेआठ ते साडेअकरापर्यंत बंद असल्यामुळे रहिवाशांना शिधावाटप केंद्र हे गैरसोयीचे होत होते. याबाबब माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी रेशनिंग अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले असून नुकतेच शिवडी कोळीवाडा येथे नवीन दुकानात शिधावाटप केंद्र सुरू केले. यावेळी माजी नगरसेवक सचिन पडवळ, माजी नगरसेविका श्वेता राणे, शाखाप्रमुख बैजू हिंदोळे, महिला शाखा संघटक शुभदा पाटील, श्रद्धा घोसाळकर, विजयकुमार वाघ, तुषार रेडीज आदी मान्यवर उपस्थित होते.




























































