
बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे पुढच्या महिन्यात होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेआधीच हिंदुस्थानी क्रीडा पथकाला मोठा धक्का बसला आहे. हिंदुस्थानसाठी सुवर्णपदकाची दावेदार असलेली सहा वेळची विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम राष्ट्रकुल निवड चाचणी स्पर्धेत खेळताना जायबंदी झाली. त्यामुळे तिला या स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे आता येत्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मेरी कोमचा सहभाग धोक्यात आला आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 48 किलो वजनी गटातील पहिल्या फेरीत नितूविरुद्धच्या सामन्यात ऑलिम्पिक मेडलिस्ट मेरीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आणि तिला सामना अर्ध्यावरच सोडावा लागला. सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या मेरीला आता पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे होणाऱया राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.
स्कॅनसाठी रुग्णालयात
हरयाणाची बॉक्सर नितूने राष्ट्रकुल चाचणी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 2018 साली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱया 39 वर्षीय मेरीने दुखापत झाली असूनही काही काळ नितूविरुद्धच्या सामन्यात संघर्ष दाखवला, परंतु वेदनांमुळे तिला संतुलन राखणे अवघड होत होते. त्यामुळे तिला रिंगमधून स्ट्रेचरवरून न्यावे लागले आणि रेफ्रीने नितूला विजयी घोषित केले. मेरीला स्कॅनसाठी रुग्णालयामध्ये दाखल केले गेले आहे.
























































