आभाळमाया – कोसळते कृष्णविवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक  

आकाशातून  ज्याची ‘कोसळण्याची’ अपेक्षा आपण धरतो तो केवळ जीवनदायी पाऊस. एरवी अवकाशातून म्हणजे थेट पृथ्वीपलीकडून काहीतरी येऊन ‘आदळणार’ असेल तर ती कल्पनाच भीतीदायक आणि कदाचित विनाशकारीही. आपण उल्का पडताना पाहतो. गेल्या 30 मे रोजी रात्री असाच उल्कावर्षावाचा काळ होता. मुंबईबाहेरच्या एका बंगल्यावरून आम्ही आकाशाकडे डोळे लावून बसलो होतो. शौरी तारकासमूहातून हा ‘वर्षाव’ व्हायचा होता, पण पावसाचे ‘अंदाज’ जसे चकवा देतात तसं झालं. चार-दोन उल्का इकडे-तिकडे दिसल्या, पण ‘वर्षाव’ म्हणायचा असं नयनरम्य काही घडलं नाही. अशा वेळी मन खट्टू होतं. मात्र पृथ्वीजवळून जाणारा एखादा महापाषाण (अशनी) पृथ्वीवर कोसळल्याचं भाकीत खोटं ठरलं की, मात्र बरं वाटतं. आजवर अशी अनेक भाकितं 1968 पासून ऐकली आहेत आणि योगायोगाने ती खोटी ठरली आहेत.

पृथ्वीच्या  जन्मानंतरचा बराच काळ म्हणजे कोटय़वधी वर्षे. आपल्या या ग्रहाला अवकाशात इतस्ततः फिरणाऱ्या अशनींचे, धूमकेतूंचे तडाखे सहन करावे लागले. त्यांचा अविरत मारा थांबल्यानंतरच इथे जीवसृष्टीचा आरंभ झाला. तरीही ‘अवघ्या’ साडेसहा कोटी वर्षांपूर्वी एका भीषण महापाषाणाने पृथ्वीवरचे सारे महाकाय डायनोसॉर नष्ट केलेच. आता तसं काही मानवी वस्तीत घडलं तर हाहाकारच व्हायचा, पण ती शक्यता अत्यंत कमी आहे. अलीकडे आणखी एका अवकाशस्थ ‘वस्तू’च्या कोसळण्याच्या शक्यतेची बातमी चर्चेत आली, ती म्हणजे साक्षात कृष्णविवराचे कोसळणे! कृष्णविवर महाकाय असते. ते प्रचंड वस्तुमानच काय, प्रकाशही गिळते. ज्याचा ठावठिकाणा जिथे काहीच दिसत नाही आणि गोलाकार कडेला प्रकाश दिसतो अशा निरीक्षणावरून ठरते ते ब्लॅक होल ऊर्फ कृष्णविवर ‘कोसळू’ शकतं.

1916 मध्ये अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी गुरुत्वीय लहरींचा सिद्धांत मांडला. दोन महाकाय कृष्णविवरांच्या टकरीनंतर त्यांच्या विलीनीकरणाच्या वेळी जे वस्तुमान ऊर्जेच्या रूपात मुक्त होईल, त्यातून गुरुत्वीय लहरी उमटतील असं काहीसं त्या सिद्धांताचं स्वरूप. आइन्स्टाइन अक्षरशः द्रष्टे शास्त्रज्ञ होते. त्यांनी केलेलं भाकीत जगभराच्या ‘लायगो’ प्रकल्पाद्वारे 2016 मध्ये सिद्ध झालं. गुरुत्वीय लहरींची नोंद पृथ्वीवर झाली. एखादा तारा मरण मरणपंथाला लागतो तेव्हा त्यांचं लाल महाताऱ्यात रूपांतर होतं. त्याचं वस्तुमान आपल्या सूर्य ताऱ्याच्या वस्तुमानापेक्षा कमी असेल तर, सूर्याइतकंच असेल तर आणि सूर्याच्या वस्तुमानाच्या सुमारे 3.44 पटीने अथवा त्याहून जास्त असेल तर त्याचं ‘ब्लॅक-होल’मध्ये रूपांतर होतं. अशी असंख्य कृष्णविवरं आपल्या विराट विश्वात आहेत. आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागीही शक्तीशाली कृष्णविवरच आहे आणि आपली सूर्यमाला त्याभोवती 22 कोटी वर्षात एक परिक्रमा पूर्ण करते.

मग कृष्णविवर एवढं विशाल असेल तर ते पृथ्वीवर कसं काय कोसळेल? हा साधा प्रश्न, परंतु प्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी ‘प्रायमॉरडिअल’ किंवा विश्वनिर्मितीच्या अगदी आरंभीच्या काळात तयार झालेल्या सूक्ष्म (म्हणजे अगदी एखाद्या अणूच्या आकाराच्याही) कृष्णविवरांची कल्पना मांडली. अशी अतिप्राचीन कृष्णविवरं विश्वात सर्वत्र म्हणजे पृथ्वीच्या आसपास सूर्यमालेभोवतीही असू शकतात आणि पृथ्वीवर आदळू शकतात.

प्रचंड वस्तुमान कमीत कमी जागेत एकवटून प्रचंड गुरुत्वाकर्षणाची लहानमोठी कृष्णविवरं तयार होतात. आपल्या पृथ्वीवरून सारं वस्तुमान एका सूक्ष्म जागेत एकवटलं तर तिचं गुरुत्वाकर्षण कमी होऊन आकारमान मात्र कदाचित डाळीच्या दाण्याइतकंच दिसेल. हे कल्पनेपलीकडचं वाटत असले तरी कृष्णविवरं अशाच विश्वरचनाशास्त्रीय प्रक्रियेतून बनतात.

…तर, एखादं सूक्ष्म कृष्णविवर पृथ्वीवर कोसळलं तर? तर अर्थातच काहीतरी परिणाम करेलच. कदाचित मोठा उत्पातसुद्धा. ते कुठे कोसळतं यावर त्या विनाशाचं स्वरूप अवलंबून असेल. बहुधा अशा असंख्य सूक्ष्म अवकाशस्थ गोष्टी पृथ्वीवर अधिक जागा व्यापणाऱ्या समुद्रातच पडतात, पण जमिनीवर माहीत असलेल्या ठिकाणी सूक्ष्म कृष्णविवर आदळलं तर नक्कीच त्या भागात छोटंसं विवर तयार होईल. मात्र, त्याचा परिणाम पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ओसरत जाईल असंही सांगितलं जातं. असंच घडेल की सूक्ष्म कृष्णविवर आपली शक्ती वाढवत पृथ्वीलाच गिळेल! की मुळात ते अस्तित्वातच नाही! असे परस्परविरोधी प्रश्न आहेतच, पण हा ‘वाद’ अवकाशातील आहे. त्यावर आता संशोधन सुरू आहे. नित्यनवं संशोधन हेच विज्ञानाचं धन असतं!

[email protected]