
मीटरमध्ये छेडछाड करून तब्बल एक कोटी 94 लाखांची वीजचोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाचे कार्यकारी प्रदीप राधेशाम सावंत यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
‘छत्रपती जीनिंग ऍण्ड प्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेड’चे राहुल भरत पवार व दादासाहेब अण्णासाहेब बांदल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप सावंत व भरारी पथकातील सहायक अभियंता गफ्फार शेख, आशिष नावकार, सुधीर किनगे, धनंजय एकबोटे, दत्तात्रय पोटकुले यांनी दि. 16 रोजी मिरजगाव परिसरातील शिवाचा मळा रोड येथे छत्रपती जिनिंग ऍण्ड प्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेडचे या कंपनीमध्ये जाऊन वीज मीटरची तपासणी केली. यावेळी मीटरमध्ये छेडछाड करून मीटरला येणारा इनकम्पिंग करंट हा कमी प्रमाणात नोंद होईल व त्यामुळे वीज मीटरमध्ये कमी वापराची नोंद होईल, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे आढळले.
घटनास्थळावरून वीज मीटर व त्यात टाकलेले रिमोट सर्किट भरारी पथकाने ताब्यात घेतले. या छेडछाडीमुळे सहा महिन्यांत 11 लाख 16 हजार 743 युनिट विजेची चोरी केल्याचे स्पष्ट झाल्याने व त्याच्या अधिभारासह 1 कोटी 94 लाख 82 हजार 859 रुपये न भरल्याने सावंत यांनी राहुल पवार व दादासाहेब बांदल यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.


























































