
रेल्वे फलाटावर झोपण्यास विरोध केल्याने पादचाऱ्याने प्रवाशावर चाकूहल्ला केल्याची घटना बोरिवली रेल्वे स्थानकात घडली. राजेश दुबे असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. चाकूहल्लाप्रकरणी अजगर अली सय्यदला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
नवनीतकुमार सुमकीया हे बोरिवली आरपीएफ कार्यालयात काम करतात. दोन दिवसांपूर्वी नवनीतकुमार हे फलाट क्रमांक 10 येथे गस्त करत होते. तेव्हा तेथे अजगरअली हा झोपला होता. नवनीतकुमार याने अजगर अलीला फलाटावरून बाहेर जाण्यास सांगितले. तेव्हा अजगर अलीने आपण बाहेर जाणार नाही असे नवनीतकुमारना सांगितले. नवनीतकुमार हे अजगरची समजूत घातली, मात्र अजगरअली हा ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तेव्हा तेथून राजेश जात होते. हा प्रकार राजेशच्या निदर्शनास आला.
तेव्हा राजेशने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राजेश हे तेथून निघून झाले. राजेश हे ब्रिजवरून जात असतानाच अजगरने मागून येऊन त्याच्यावर चाकूहल्ला केला. चाकूहल्ल्यात राजेश हे जखमी झाले. हा प्रकार नवनीतकुमारच्या लक्षात आला. त्याने याची माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांना दिली. काहीच वेळात पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी राजेशला रुग्णालयात दाखल केले. नवनीत याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी अजगर अलीला बोरिवली रेल्वे स्थानकातून ताब्यात घेऊन अटक केली.


























































