
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावरच पाण्याचे डबके तयार झाल्याने नगरपंचायतीमध्ये कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्याच्या डबक्यातूनच नगरपंचायतीमध्ये प्रवेश करावा लागत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून मुख्याधिकारी पाण्याच्या डबक्या कडे लक्ष देतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील गटारे सुरुवातीच्या पावसात नगरपंचायत प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाचे तीन तेरा वाजल्याने शहरातील अनेक गटारामधील पाणी रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
मात्र शहरातील सांडपाणी निचऱ्याचे तीन-तेरा वाजले असतानाच नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावरच भलामोठा खड्डा पडल्याने त्या ठिकाणी पाण्याचे तळे निर्माण झाले आहे. या ठिकाणी अस्वच्छ पाणी साठून राहिल्याने नागरिकांना आपले वाहन त्यातूनच हाकावे लागत आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने एखादे अपघात घडला किंवा एखादे वाहन सरकून पडले तर त्या घटनेला जबाबदार कोण? असा सवाल देखील शहरातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावरच असे सांडपाणी साचून रोगराईला निमंत्रण दिले जात असेल तर शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावर अस्वच्छ पाण्यातूनच मुख्यधिकारी कौस्तुभ गव्हाणे तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी शहरातून जनतेने निवडून दिलेले नगरसेवक अस्वच्छ पाण्यातून आपले वाहन हाकतात. परंतु नगरपंचायत प्रशासनाच्या प्रवेशद्वारावर निर्माण झालेल्या डबक्या कोण लक्ष देणार नगरपंचायतीमध्ये कामकाजासाठी येणाऱ्या जनतेने अस्वच्छ पाण्यातूनच नगरपंचायत प्रवेश करावा का? असे एक ना अनेक सवाल नागरिकांमधून उपस्थित केले जात असले तरी याकडे मुख्याधिकारी लक्ष देणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
देवगड जामसंडे शहरातील घनकचरा जमा करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहने देखील या डबक्यात उभी केल्याने त्यांचे मागील चाक अर्ध्याहून अधिक पाण्यामध्ये जात असून होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आतातरी मुख्याधिकारी नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावर निर्माण झालेल्या अस्वच्छ पाण्याच्या डबक्यावर उपाययोजना करतील का? असा सवाल शहरवासीयांना मधून उपस्थित केला जात आहे.






























































