पश्चिमरंग – गोल्डबर्ग व्हेरिएशन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुष्यंत पाटील –

थीम अँड व्हेरिएशन्स प्रकारातलं संगीत रचावं. या प्रकारच्या संगीतात आधी एक थीम येते. मग तीच थीम काही बदल होऊन वेगळ्या स्वरूपात येते. याला आपण थीमचं पहिलं व्हेरिएशन असं म्हणू शकतो. यानंतर मूळचीच थीम काही वेगळे बदल होऊन अजून वेगळ्या स्वरूपात येते. हे थीमचं दुसरं व्हेरिएशन असतं. याप्रमाणं थीम अँड व्हेरिएशन्समध्ये एकाच थीमच्या कित्येक व्हेरिएशन्स येऊ शकतात. बाखच्या परीसस्पर्शानं थीम अँड व्हेरिएशन्सची एक अजरामर रचना बनली गेली.

सर्वसाधारण पावणेतीनशे वर्षांपूर्वीची गोष्ट. रशियन साम्राज्याचा एक राजदूत जर्मनीमधल्या एका राज्यात राहायचा. उच्च पदावर असल्यानं त्याचं सामाजिक, राजकीय वर्तुळात अतिशय महत्त्वाचं स्थान होतं. त्याचं नाव होतं कायझार्ंलग.

या कायझार्ंलगला चाळिशीत एक त्रास सुरू झाला होता. निद्रानाशामुळं तो रात्री तळमळत पडायचा. आजच्या काळात तो असता तर कदाचित त्यानं रात्री तळमळताना म्युझिक प्लेअरवर एखादं शांत, संथगतीचं संगीत लावून मंद प्रकाशात बिछान्यावर पडणं पसंत केलं असतं, पण अर्थातच पावणेतीनशे वर्षांपूर्वी ते शक्य नव्हतं. त्यानं एक हार्प्सीकॉर्ड वादक आपल्या घरी ठेवला होता (हार्प्सीकॉर्ड हे वाद्य म्हणजे पियानो या वाद्याची आधीची व्हर्जन असं म्हणता येईल). रात्री झोप येत नसेल तर तो शेजारच्या छोटय़ाशा खोलीतल्या या वादकाला हार्प्सीकॉर्डवर संगीत वाजवायला सांगायचा.

या वादकाचं नाव होतं योहान गोल्डबर्ग. त्याचं वय अवघं 14 होतं, पण हार्प्सीकॉर्ड वाद्यावर त्याचं प्रभुत्व होतं. बरोक कालखंडातील महान संगीतकार योहान सेबॅस्टियन बाख याचा थोरला मुलगा विल्हेम बाख याच्याकडं गोल्डबर्ग हार्प्सीकॉर्ड वादनाचे धडे घ्यायचा, पण काही वेळेला त्याला योहान सेबॅस्टियन बाख याच्याकडूनही शिकण्याची संधी मिळायची.

एकदा कायझार्ंलगनं योहान सेबॅस्टियन बाखला आपली समस्या सांगितली. त्यानं बाखला संथ लयीचं, मूड आनंदी करणारं असं संगीत रचायला सांगितलं. बाखची ही रचना कायझार्ंलगला रात्री झोप येत नसताना गोल्डबर्ग वाजवणार होता. त्यामुळं कायझार्ंलगचा त्रास कमी होणार होता.

बाखला वाटलं की, यासाठी आपण थीम अँड व्हेरिएशन्स प्रकारातलं संगीत रचावं. या प्रकारच्या संगीतात आधी एक थीम येते. मग तीच थीम काही बदल होऊन वेगळ्या स्वरूपात येते. याला आपण थीमचं पहिलं व्हेरिएशन असं म्हणू शकतो. यानंतर मूळचीच थीम काही वेगळे बदल होऊन अजून वेगळ्या स्वरूपात येते. हे थीमचं दुसरं व्हेरिएशन असतं. याप्रमाणं थीम अँड व्हेरिएशन्समध्ये एकाच थीमच्या कित्येक व्हेरिएशन्स येऊ शकतात.

काहीसा तोचतोचपणा येत असल्यानं बाखला या प्रकारचं संगीत रचताना फारशी मजा येत नव्हती, पण यानिमित्तानं बाखच्या परीसस्पर्शानं थीम अँड व्हेरिएशन्सची एक अजरामर रचना बनली गेली. यातलं थीम म्हणून वापरलेलं संगीत बाखनं पूर्वीच रचलेलं होतं. आता त्यानं आपल्या कल्पकतेनं एकापेक्षा एक अशा सुंदर व्हेरिएशन्स रचल्या.

स्वतःसाठी रचलेल्या या व्हेरिएशन्सचं कायझार्ंलगला खूप कौतुक होतं. रात्री झोप येत नसेल तर तो गोल्डबर्गला ‘‘माझी व्हेरिएशन्स वाजव’’ असं सांगायचा. कायझार्ंलगला हे संगीत प्रचंड आवडायचं. त्यानं बाखला या रचनेसाठी एका चषकात तब्बल 100 सुवर्णमुद्रा भरून दिल्या. एवढी मोठी रक्कम बाखला आयुष्यभरात कुठल्याच कामासाठी मिळाली नव्हती.
बाखच्या या रचनेत मूळ थीमसोबत 30 व्हेरिएशन्स येतात. ही संगीत रचना 1741 मध्ये प्रकाशित झाली. गोल्डबर्ग यानंच सर्वप्रथम ही व्हेरिएशन्स वाजवल्यानं ही व्हेरिएशन्स गोल्डबर्ग व्हेरिएशन्स या नावानंच ओळखली जाऊ लागली.

गोल्डबर्ग व्हेरिएशन्समागची वर सांगितलेली गोष्ट बाखच्या 1802 साली फॉर्केलनं लिहिलेल्या चरित्रात येते, पण काही लोकांच्या मते ही संगीत रचना कायझार्ंलगसाठी केली असती तर त्यावेळी छापल्या गेलेल्या संगीताच्या प्रतींमध्ये कायझार्ंलगचं नाव यायला हवं होतं. प्रत्यक्षात मात्र त्या काळच्या प्रतींमध्ये असं काही नाव दिसत नाही.

मूळ हार्प्सीकॉर्डसाठी लिहिलेली ही रचना आज बहुतेक वेळा पियानोवरच वाजवली जाते. आपण यूटय़ूबवर Goldberg Variations असा शोध घेतला तर आपल्याला ही रचना सहज मिळू शकते. थीम अँड व्हेरिएशन्स प्रकारात मोडणाऱया सर्वात महत्त्वाच्या रचनांपैकी एक असणारी ही संगीत रचना ऐकताना आपल्याला आजही तितकीच मजा येते.

– [email protected]