
उदगीर तालुक्यातील मौजे सोमनाथपूर येथून अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवत पळवून नेल्याप्रकरणी तिघांविरुध्द उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे.
त्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या नातेवाईकांच्या घराच्या बांधकामासाठी गोपाळ जयसिंग तांदळे हा मिस्त्री म्हणून येत होता. त्यांच्याच जातीमधील असल्यामुळे त्याचे वडील जयसिंग तांदळे यांच्याशी लग्नाची बोलणी केली होती. परंतु, मुलीचे वय लहान असल्यामुळे आणि ती शिक्षण घेत असल्यामुळे लग्नाचा विचार इतक्यात नव्हता. 29 जून रोजी तक्रारदाराच्या मुलीला गोपाळ जयसिंग तांदळे याने घेऊन गेल्याचे समजले. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन आमच्या मुलीस घरी आणून सोडायला सांगा असे म्हटले असता जयसिंग तांदळे आणि उषाबाई तांदळे यांनी आमच्या मुलाला तुझ्या मुलीशी लग्न करायचे आहे म्हणून पळवून नेले आहे. तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगून शिवीगाळ केली.
उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गोपाळ जयसिंग तांदळे, उषााबाई जयसिंग तांदळे, जयसिंग तांदळे यांच्याविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.



























































