
शिरूरच्या पश्चिम भागातील कवठे येमाईच्या गांजेवाडी (माळीमळा) परिसरात बिबट्याची दहशत कायम असून काल शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान विकास बबन घोडे हे घराजवळील उसाच्या शेतानजीक शेळ्या चरण्याचे काम करीत असताना उसाच्या शेतातून अचानक आलेल्या बिबट्याने शेळीवर हल्ला करून तिला उसाच्या शेतात ओढत नेले. विकास यांनी आरडाओरडा केल्याने जवळील शेतकऱ्यांच्या मदतीने उसातून शेळीला बाहेर काढले, पण तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वनकर्मचारी हनुमंत कारकूड हे भर पावसात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेचा पंचनामा केला असून शासन नियमानुसार योग्य ती नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यास मिळणार असल्याचे शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.
नागरिकांनी आपल्या पशुधनाचे बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्याकामी खबरदारी घेण्याचे आवाहन वनपरिमंडळ अधिकारी गणेश पवार, वनरक्षक ऋषिकेश लाड यांनी केले आहे. दरम्यान परिसरात दोन बिबटे प्रत्यक्ष पाहिल्याचे शेतकरी विकास घोडे यांनी सांगितले, तर घराशेजारीच असणाऱ्या बकरी, शेळ्या पशुधनावर बिबट्यांनी वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे व त्यांच्या दहशतीने रात्र जागून काढावी लागल्याचे शेतकरी गणेश घोडे यांनी सांगितले. गावातच राहणारे रमेश पवार यांच्या मोठ्या बोकडावर रात्री बिबट्याने हल्ला केल्याचे स्वराज पवारने सांगितले. बिबट्याच्या दहशतीने या परिसरात घबराट पसरली असून वनविभागाने येथे तात्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी बिपीन शिंदे, राजेंद्र नवनाथ शिंदे, बाळू मुलमुले, मनोज पवार, सुखदेव मुलमुले, सुरेश घोडे, अंकुश हनुमंत शिंदे व ग्रामस्थांनी केली आहे.





























































