नगर जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टीचे, गोदावरीत 27 हजार, तर भीमेत 23 हजार क्युसेकने विसर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरासह जिह्यात रविवारी रात्रीपासून कमीअधिक प्रमाणात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. या रिपरिपीने जिल्हा ओलाचिंब झाला आहे. अकोले, कोपरगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने जिह्यात 11 ते 14 जुलै या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिह्यातून वाहणाऱया गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधाऱयातून 27 हजार 868 क्युसेक व भीमा नदीस दौंड पूल येथे 23 हजार 819 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

नगर जिह्यात आजपर्यंत 166.3 मि.मी. (37.1 टक्के) पाऊस झाला आहे. पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे मुळा धरण 35.23 टक्के, तर भंडारदरा धरण 45.45 टक्के भरले आहे. मुळा धरणाची क्षमता 26 हजार दशलक्ष घनफूट आहे. या धरणात सद्यःस्थितीत नऊ हजार 160 दशलक्ष घनफूट पाणी आहे. धरण आतापर्यंत 35.23 टक्के भरले आहे. तसेच भंडारदरा धरणाची क्षमता 11 हजार 39 दशलक्ष घनफूट असून, धरणात सद्यःस्थितीत पाच हजार 17 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. हे धरण 45.45 टक्के भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास 15 ऑगस्टपूर्वी भंडारदरा धरण भरण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, नाशिक जिह्यातील विविध धरणांद्वारे सोडलेल्या विसर्गामुळे नांदुरमधमेश्वर बंधाऱयातून 27 हजार 868 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यासह पुणे जिह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीतून दौंड पूल येथे 23 हजार 819 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठय़ात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे.