
कोरोना रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय असणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीकरणात आता 15 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंत 75 दिवस ‘कोविड लस अमृत महोत्सव’ उपक्रम राबवला जाणार आहे. यामध्ये 18 वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांना कोविडचा ‘प्रिकॉशन डोस’ पालिका आणि सरकारी व्हॅक्सिनेशन सेंटरवर मोफत देण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या घोषणेनुसार हा ‘कोविड लस अमृत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर सुमारे वर्षभराने 16 जानेवारी 2021 पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये 18 वर्षांवरील पात्र असलेल्या 92 लाख 34 हजार लाभार्थ्यांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. तर कोरोना रोखण्यासाठी तिसरा म्हणजेच ‘प्रिकॉशन डोस’ देण्याचा निर्णय पेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. यानुसार 18 वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर 6 महिने अथवा 26 आठवडे पूर्ण झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोस विनामूल्य दिला जाणार आहे.































































