मनतरंग – डावं-उजवं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

उदाहरण देणं वेगळं आणि तुलना करणं वेगळं असतं. उदाहरण देताना आपण व्यक्ती कशी आहे हे सांगत असतो आणि तुलना करताना आपण दोन व्यक्तींमध्ये डावं-उजवं करतो. त्यामुळे आपल्याकडून काही नकारात्मक शेरे जातात जे व्यक्तीला दुखावू शकतात. मुलांमध्ये तुलना करूच नये आणि जर असेल कोणी करत तर पालक म्हणून मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे.

मी मनातल्या मनात खूप रडायचे, जोरजोरात ओरडायचे, पण मनातलं कोणाला कळणार…? समुपदेशनासाठी बसलेली शिबा (नाव बदलले आहे) तिच्या मनातला दुखरा कोपरा हळूहळू उलगडून सांगत होती. यंदा तिचं कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं, पण हल्ली काही दिवसांपासून तिला अस्वस्थता जाणवू लागली होती. काही नवीन काम करण्याचा उत्साह निघून जात होता. एकटं राहावंसं वाटत होतं. तिच्या म्हणण्यानुसार तिला घरात कोणीही समजून घेणारं नव्हतं. त्यामुळे घरी तिची चिडचिड वाढली होती. दुसरीकडे; तिच्या पालकांचं म्हणणं असं होतं की, शिबा अत्यंत हुशार, पण हट्टी अशी होती.

हिला मॅडम काहीही झालेलं नाही. काही स्ट्रेस की डिप्रेशन वगैरे म्हणतात ना तसं काहीही नाहीये. फक्त एस्क्युझेस (सबबी सांगणं) सांगण्यात पटाईत झालेली आहे… वडील हे असं तिच्याबद्दल तावातावाने सांगत होते आणि शिबा त्यांच्याकडे पाहून खिन्नपणे हसत होती.

मानसिक अस्वास्थ्य असू शकतं हेच मुळात बऱयाच जणांना पचनी पडत नसतं. ताणतणाव, नैराश्य कधीही आणि कुठल्याही वयात (अगदी छोटय़ा बाळालाही) येऊ शकतं हेही कळत नाही. तिचे पालक या प्रकारात मोडत होते.

शिबाची गोष्ट थोडक्यात अशी होती. सुखवस्तू घरात जन्म घेतलेल्या तिला कशाचीही ददात नव्हती. शिबाला एक मोठी बहीण होती. दोन्ही बहिणींमध्ये मात्र जमीन अस्मानाचा फरक होता. मोठी बहीण ही अभ्यासात एकपाठी असल्यामुळे शाळेत तसेच घरी हुशार म्हणून प्रसिद्ध होती. स्वभावाने बोलकी असल्यामुळे तिचा मित्रपरिवार भरपूर होता. शिबा तिच्याविरुद्ध स्वभावाची होती. तिला मित्रमैत्रिणी पहिल्यापासून मोजकेच होते. शाळेत तिची ओळख तिच्या बहिणीमुळे होती. पालक आणि नातेवाईकही या दोन्ही बहिणींची सतत तुलना करत राहायचे.
या तुलनेचा परिणाम शिबावर हळूहळू होऊ लागला. शाळेमध्ये अभ्यासात दुर्लक्ष व्हायला लागले. घरीही ती इतरांबरोबर मिसळेनाशी झाली. तिच्या मनात गैरसमजांचं जाळं तयार व्हायला लागलं. शिबाला तहानभूक लागत नव्हती आणि तिची रात्रीची झोपही कमी झाली होती. वय लहान असल्यामुळे तिला काही केल्या कारणं कळत नव्हती.

तिच्या पालकांना तिच्यातला हा बदल जाणवल्यावर त्यांनी तिला मानसोपचारांसाठी नेलं. त्याचा अपेक्षित परिणाम काही महिन्यांत दिसू लागला. तेव्हा त्यांनी तिचे मानसोपचार तज्ञांना न सांगता थांबवले. काही काळानंतर शिबाला पुन्हा अतिविचार आणि ताणतणाव यांचा त्रास जाणवायला लागला. अभ्यास आणि मार्क मात्र व्यवस्थित होते. तिने पुन्हा तिच्या मानसिक अस्वास्थ्याची तिच्या पालकांना कल्पना दिली. तेव्हा ‘‘अभ्यास तर चांगला आहे तुझा. आता कसला ताण?’’ असं म्हणून आईने तिला तिच्या मनाचे जास्त लाड न करण्यास सांगितले.

या सगळ्यात शाळेची वर्षे निघून गेली. हल्ली शिबा अत्यंत अबोल झाली होती. तिच्या खोलीतच बसून राहत होती. नातेवाईक तसंच घरच्यांसोबत मोजपंच बोलत होती. तिच्या मते तिच्या आई-वडिलांसाठी ती कायम दुर्लक्षित होती. त्यामुळेच ते तिला समजून घेत नाहीत असा तिचा ग्रह व्हायला लागला. या सगळ्यातून त्यांच्यावर तिची चिडचिड व्हायला लागली. ती त्यांना वाटेल तसं बोलत लागली.

पालकांचा राग आणि त्यातही त्यांना तिचं दुःख समजावं हाही शिबाचा अट्टहास होता. तिचा त्यांचं स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न वाढला, पण हे सर्व तिच्यासाठी त्रासदायक ठरत होतं. कारण एका बाजूला माझ्या पालकांनी माझ्याकडे लक्ष द्यावं ही तिची अपेक्षा तर दुसऱया बाजूला ‘मी माझं बघून घेईन’ हा हट्ट. त्यामुळेच शिबा पुन्हा अतिविचारांच्या जाळ्यात स्वतःला गुरफटवून घेत होती.

तिच्या गोंधळलेल्या मनःस्थितीला अतिशय संवेदनशीलतेने हाताळणं गरजेचं होतं. तसंच तिच्या पालकांचंही समुपदेशन गरजेचं होतं. सर्वप्रथम त्यांच्या मनातील ‘मानसिक समस्यां’बाबत गैरसमज दूर करणं महत्त्वाचं होतं. ‘‘मानसिक आजार म्हणजे वेडेपणा आहे ना मॅडम?’’ शिबाची आई विचारत होती. शिबाच्या बाबांनीही तिची ‘री’ ओढली. ‘‘अहो, आमची मुलगी व्यवस्थितच वागतेय, पह्नवर ती तिच्या मैत्रिणीसोबत बोलते तेव्हा चांगली हसत खेळत असते. तिच्या सगळ्याच डिमांड्स आम्ही पूर्ण करतो. आता कशाला येईल तिला डिप्रेशन?’’
‘‘तुम्ही आताही तिची आणि तिच्या बहिणीची तुलना करताय का?’’ हा प्रश्न विचारला गेल्यानंतर दोघेही चपापले. ‘‘हो, म्हणजे…’’ शिबाची आई स्वतःची बाजू सावरत म्हणत होती, ‘‘कधीतरी होतेच तुलना, पण काय करणार? हिने व्यवस्थित वागावं म्हणून तर आम्ही हिच्या बहिणीचं तिला उदाहरण देत असतो.’’

‘‘उदाहरण देणं वेगळं आणि तुलना करणं वेगळं असतं. उदाहरण देताना आपण व्यक्ती कशी आहे हे सांगत असतो आणि तुलना करताना आपण दोन व्यक्तींमध्ये डावं-उजवं करतो. त्यामुळे आपल्याकडून काही नकारात्मक शेरे जातात जे व्यक्तीला दुखावू शकतात.’’ हे ऐकल्यावर दोघेही शांत झाले. कुठेतरी काहीतरी चुकल्याची जाणीव त्यांना झाली. दोन मुलींमध्ये तुलना नको आणि जर असेल कोणी करत तर तिच्या पाठीशी खंबीर उभं राहणं गरजेचं आहे हे त्यांना सांगण्यात आलं.

नातं हे कुठलंही असो, शेवटी विश्वास हा त्याचा पाया असतो. आईवडील त्यांना स्वतःला बदलत होते. शिबालाही समजून घेत होते. दोन्ही मुली या पूर्णपणे स्वतंत्र आचार विचारांच्या आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर करायला हवा हे त्यांना आता महत्त्वाचं वाटू लागलं होतं.

सगळ्यात शेवटी मनाच्या समस्यांबाबतही ते कमालीचे जागरूक झाले होते. संवेदनशील बनले होते. आता शिबा थोडीफार आईवडिलांच्या जवळ जायला लागली आहे. त्यांच्या सोबत वेळ घालवतेय. बहिणीसोबत शॉपिंगही करतेय.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
n [email protected]