
मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. मात्र, येत्या तीन दिवसांत राज्यात ढग आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा पुणे हवामान विभागाचे प्रमुख आणि ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे. त्यामुळे पाऊस पुन्हा राज्यात सर्वदूर पसरणार आहे.
राज्यात जून कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात पावसाची दमदार हजेरी सुरू आहे. मात्र, मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने गेल्या आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली. नाशिक आणि पालघर जिल्ह्यात नद्या भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात आता हवामान विभागाने मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
18 जिल्ह्यांना येलो अलर्ट
हवामान विभागाने 26 ते 28 जुलैपर्यंत पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, धाराशीव, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 18 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. येलो अलर्टमुळे येथे तुरळक, मध्यम आणि मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, गुरुवारनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.





























































