
प्रजा फाऊंडेशनने मुंबईतील आमदारांच्या जाहीर केलेल्या वार्षिक कामगिरीच्या प्रगतिपुस्तकात शिवसेना विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांनी सलग तिसऱया वर्षी ‘टॉप थ्री’मध्ये येण्याचा मान पटकावला आहे. यामुळे प्रभू यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मुंबईतील आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात केलेल्या कामगिरीचा आणि अधिवेशनादरम्यानच्या काळातील कामगिरीचा प्रगती अहवाल ‘प्रजा’ने नुकताच प्रसिद्ध केला आहे. यात मुंबईतील आमदारांच्या टॉप 10 च्या क्रमवारीत काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांना अक्वल स्थानी राहिले आहेत. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिवाळी अधिवेशन 2019 ते पावसाळी अधिवेशन 2021 या कालावधीत मूल्यांकन करून क्रमवारी ठरवण्यात आली आहे. आमदारांची क्रमवारी ठरवताना विधानसभेत अधिवेशन काळात विचारण्यात आलेले सर्वसामान्यांचे प्रश्न, प्रश्नांची गुणवत्ता, आमदार निधीचा वापर, सभागृहातील हजेरी यासारख्या कामागिरीसाठी 87 पैकी गुण देण्यात आले आहेत. तर शैक्षणिक अहर्ता, पॅन कार्ड आणि गुन्हेगारीची प्रकरणे यांसारख्या निकषासाठी 13 पैकी गुण देण्यात आले. 2019 च्या निवडणुकीनंतरच्या नव्या एफआयआर साठी 5 गुण वजा करण्यात आले. तर प्रलंबित चार्ज शीटसाठी पाच गुण वजा करण्यात आले आहेत.






























































