
>> महेंद्र पाटील
आज मी तुझ्या शहरात येऊन गेलो. पण तू दिसली नाहीस कुठेच तुझ्या शहरात. तुझ्या घरासमोरचा रस्ता, तुझे अंगण, खिडकीसुद्धा रिकामी… कुठे असशील तू किती शोध घ्यायचा तुझा आणि किती वर्षं. नेहमी तुझ्या शहरात येतो, तुझाच विचार करत मन तुलाच शोधत असतं. चौकाचौकात…
तुझ्या शहरात तुझ्या घराचा रस्ता येताच पावलांचा वेग मंदावतो. पावलं अडखळत चालू लागतात आणि तुझ्या घराच्या वळणावर मागे वळून पाहणारे डोळे तुझ्या घराच्या बंद खिडकीकडे पाहून हिरमुसतात. हे नित्य नेमाने माझं मन करत असतं. पण तरी प्रत्येक ऋतूमध्ये मनात नवीन आशा निर्माण होते. मनाला वाटत असतं की निसर्ग नियमाप्रमाणे शिशिराची पानगळ संपून वसंत ऋतू येतो तसं आपल्या नात्याच्या बाबतीत व्हावं. पण तसं होत नाही. आपल्या नात्याचा गेली काही वर्षं फक्त वैशाख आणि ग्रीष्म हे दोनच ऋतू सुरू आहेत. प्रेमाची हीच तर गंमत असते. मनात कायम श्रावण सरींचा आनंद देणारे प्रेम प्रत्यक्ष जीवनात मात्र वैशाख वणव्याचा अनुभव देते. तरीही अशा प्रेमाला जिवंत ठेवण्याचं काम मन करते. बुद्धी तर तुझा पत्ता केव्हाच विसरली आहे, पण मन मात्र विसरत नाही. सगळय़ा गर्दीतही मनाला तुझ्या सगळय़ा आठवणखुणा लक्षात आहेत. नाहीतर एव्हाना मी तुझा शोध घेणं सोडून दिलं असतं. पण आज तू दिसली नाहीस म्हणून परतीच्या वाटेवर असताना मी माझ्या मनाला सांगतोय की, पुन्हा आता वेडी आशा मनात बाळगून जगू नकोस. तू पुन्हा कधी समोर येशील हे सगळं नियतीला ठरवू दे… आणि जर तू समोर आलीस तर जास्तीत जास्त काय होणार आहे हे तुलाही ठाउक आहे आणि मलाही…
तोच अबोल चेहरा, त्याच झुकलेल्या पापण्या, गर्दीच्या नजरा चुकवून दिलेली तीच चोरटी नजर. अनेक निरुत्तर प्रश्न मागे सोडून जाणारी पुन्हा एक निरूपयोगी भेट. काही क्षणांच्या त्या भेटीने आपल्या मनातल्या भावनांनी मनातल्या मनात केलेली असंख्य आंदोलनं. त्या भावनांची समजूत काढत एक ऋतू निघून जातो आणि पुन्हा नवा ऋतू आला की मनाला ओढ लागते तुझ्या शहराची… तुझ्या भेटीची… हे चक्र आता थांबलं पाहिजे. कदाचित तू आता माझी वाट पाहत नसशील. मनापासून… नाहीतर तुला चाहूल लागली असती माझ्या येण्याची. जसं पूर्वी ध्यानीमनी नसताना आपण अचानक समोर यायचो. अचानक भेट व्हायची. आपल्या भेटी जिथे जिथे व्हायच्या आता त्या प्रत्येक जागा रीत्या वाटू लागल्या आहेत. तूही त्यांना विसरलीस बहुतेक आणि तूसुद्धा आता पुसून टाकल्या असशील आपल्या सगळय़ा आठवणी. सगळय़ा खाणाखुणा… पण तू तर अशी नव्हतीस. एकमेकांना दिलेल्या चॉकलेटचे रॅपरसुद्धा जपून ठेवणारी तू, असं वागूच शकत नाही. कदाचित असं वागायला कुणीतरी भाग पाडलं असेल तुला. तुझ्या आयुष्याचे सगळे निर्णय कुणीतरी ठरवत असेल आणि तू फक्त त्या नियमाचं पालन करत असशील. तुला दोष देऊन काय फायदा…
तू अल्लड वाऱयासारखी होतीस. शुक्र ताऱयासारखी होतीस. एक दरवळ होतीस. मुक्त छंदात लिहून काढावी अशी गोड कविता होतीस. खूप काही होतीस तू तुझ्यासाठी, माझ्यासाठी आणि आता मात्र तू… तुझीसुद्धा नाहीस आणि माझीसुद्धा नाहीस. मग तू नक्की कुणाची आहेस? तुझ्या भोवती पुंपण बांधणाऱयाची? नाही नाही… हे कधीच शक्य नाही. अशा व्यक्तीची तू होऊच शकत नाहीस. अगदी जन्मोजन्मीची साथ देण्याचे वचन आणि वटवृक्षाला फेऱया मारूनसुद्धा तू त्याची होऊच शकत नाहीस. कारण त्याने तुझं अस्तित्वच पुसून टाकलंय. तुझ्या मनातल्या सगळय़ा स्वप्नांचा चुराडा केलाय आणि तू एक निर्जीव बाहुली बनून त्याच्या सोबत आहेस? त्याला तू कधीच समजली नाहीस आणि कधी समजणारही नाहीस. बघितलंस, तुला विसरायचं ठरवत असताना मनाने पुन्हा तुझी बाजू घेऊन मला तुझ्या विचारात गुंतवून ठेवलं. पुढच्या प्रवासात पुन्हा तुझ्या भेटीची आस मनात निर्माण करून माझं मन पुन्हा तुझ्या शहरात, तुझ्या घराच्या रस्त्यावर, घराच्या बंद खिडकीकडे माझे डोळे आशेने पाहतील. तू कदाचित पुन्हा दिसशील किंवा नाही. माझ्यासाठी नाही निदान तू तुझ्यासाठी तरी बाहेर यावीस. खिडकीबाहेरच्या जगाकडे पाहून पुन्हा स्वतःचा शोध घ्यावा. दूर दूर चालत जाऊन आपल्या आठवण खुणा शोधण्याचा प्रयत्न करावा. कोण जाणे, कदाचित अशाच एखाद्या वळणावर आपली भेट लिहून ठेवली असेल, एखाद्या निवांत संध्याकाळी… मग आपल्या भेटीचा वनवास त्या वनातच संपेल. माझ्या मनातली तुझ्या आठवणींची आंदोलनं संपतील. मग मला तुझ्या नव्या आठवणींना कुरवाळत तुझ्याविना तुझ्यासाठी जगण्याची उमेद मिळेल.
परतीच्या वाटेवर माझं मन तुझ्या दोन शब्दांची वाट पाहून चालू लागेल. पुन्हा एक नवी कविता मनात उमटू लागेल. जाता जाता दोन शब्द सोडून जा माझ्यासाठी, जगाची न्यारी रीत तोडून जा माझ्यासाठी…





























































