
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-20 सामना सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे खेळवला गेला. या सामन्यात विंडीजने टीम इंडियाचा पाच विकेट राखून पराभव केला. ओबेड मॅकॉयच्या भेदक गोलंदाजीसमोर हिंदुस्थानी फलंदाजी निष्प्रभ ठरली. संपूर्ण टीम इंडिया 19.4 षटकांमध्ये केवळ 138 धावांवर गुंडाळला गेला. या सामन्यानंतर हिंदुस्थानच्या पराभवापेक्षाही दुसऱयाच एका गोष्टीची चर्चा जास्त रंगली, ती म्हणजे सूर्यकुमार यादवने घातलेल्या अर्शदीप सिंगच्या जर्सीची.
पहिल्या टी-20 सामन्याप्रमाणे या सामन्यातही कर्णधार रोहित शर्मा सूर्यकुमार यादवसह सलामीला उतरला, मात्र सूर्यकुमार यादवने मैदानात पाऊल टाकताच मैदानावर जोरदार चर्चा सुरू झाली. कारण सलामीला येणाऱया सूर्यकुमार यादवने गोलंदाज अर्शदीप सिंगची क्रमांक दोनची जर्सी घातली होती. सोशल मीडियावर तर याबाबत जोरदार चर्चा झाली.
ज्या लॉजिस्टिक समस्यांमुळे सामन्याला उशीर झाला त्यामध्ये सूर्यकुमार यादवचेही सामान अडकले होते. त्यामुळे त्याला ऐनवेळी अर्शदीप सिंगची जर्सी घालून खेळावे लागले. याआधी वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही अशी परिस्थिती उद्भवली होती. अष्टपैलू दीपक हुडाने प्रसिध कृष्णाच्या जर्सीवर टेप लावून ती वापरली होती.
























































