रेल्वे प्रवाशांच्या पोटपूजेवरही जीएसटीचा भार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वत्र महागाईने कहर केला असून जीएसटीचा भार आता रेल्वे प्रवाशांच्या पोटपूजेवरही आला आहे. रेल्वे स्थानकात किंवा रेल्वेच्या कोचमध्ये तुम्ही जेवण मागविले किंवा खरेदी केले तर पाच टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. आयआरसीटीच्या कॅटरिंग सेवेवरही हा जीएसटी भार आकारला जाणार असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱया कोटय़वधी प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महागाई व जीएसटीसह अनेक मुद्दय़ांवर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. त्यात सरकारने सर्व पॅकबंद खाद्यपदार्थांवर तसेच जेवणाच्या थाळीवर आणि रेल्वे कॅटरिंग व पॅकबंद अन्नपदार्थांवरही पाच टक्के जीएसटी लावल्याने या गोंधळात आणखीनच भर पडली आहे. यासंदर्भात दिल्ली अपिलेट ऍथॉरिटी फॉर ऍडव्हान्स रूलिंग्स (एएएआर) यांनी सांगितले की, जर प्रवाशाने कोणतीही खाण्यापिण्याची वस्तू रेल्वे स्थानकात खरेदी केली किंवा ट्रेनमध्ये खरेदी केल्यास प्रवाशांना पाच टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

जीएसटीचे दर वेगवेगळय़ा वस्तूंवर त्यांच्या लागू दरावर आकारण्यात येणार आहेत. ट्रेन किंवा प्लॅटफॉर्मवरील सेवेनुसार वेगवेगळे दर लागू करण्यात येतील असे दिल्ली येथील अपिलेट ऍथॉरिटी फॉर ऍडव्हान्स रूलिंग्सने (एएएआर) संघटनेने म्हटले आहे.

दीपक ऍण्ड कंपनीची याचिका
राजधानी ट्रेन व अन्य मेल-एक्प्रेसला अन्न पुरवठा करणाऱया दीपक ऍण्ड कंपनीने एएएआरच्या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल केली आहे. ‘एएएआर’ने 26 जुलै 2018 रोजीच्या अधिसूचनेचा उल्लेख केला असून त्यात भारतीय रेल्वे, इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशन आयआरसीटीसी किंवा त्यांच्या परवानाधारकांकडून खाद्य किंवा पेयपदार्थांचा केलेला पुरवठा हा मग तो ट्रेनमध्ये असो किंवा प्लॅटफॉर्मवर कोणत्याही इनपुट टॅक्स क्रेडिटशिवाय 5 टक्के जीएसटीच्या अधीन राहणार आहे.